रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने वर्षभराच्या कालावधीत दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा वनडेमधूनही निवृत्ती घेणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. पण रोहित शर्माने विजयानंतर मी या फॉरमॅटमधून निवृत्त होत नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले. पण भविष्यातील त्याच्या प्लॅनबाबत त्याने मौन ठेवले आहे. पण तरीही रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत माजी खेळाडूंना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. यावर एबी डिव्हिलियर्सने उत्तर दिले आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग धरण्यामागचं कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माबाबत एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टनुसार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्याबाबत योजनांची माहिती द्यावी असे बोर्डाने सांगितले होते, जेणेकरून त्या दृष्टीने संघबांधणी करता येईल. पण रोहितने निवृत्तीच्या चर्चांना नकार दिला असला तरी तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. कारण तोपर्यंत रोहित शर्मा ३९ वर्षांचा आहे.

आता एबी डिव्हिलियर्सने रोहित निवृत्त न होण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माने कोणत्याही प्रकारची टीका सहन करू नये, असे त्याचे मत आहे. रोहितने निवृत्ती का घ्यावी तो एक महान कर्णधार आहे. असे मत एबी डिव्हिलियर्सचे आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “रोहित शर्माकडे निवृत्तीचे कोणतेही कारण नाहीये. त्याने कोणतीही टीका सहन करण्याचे कोणतंही कारण नाही. त्याचे रेकॉर्डचं सर्व सांगतात. इतकंच नाही तर त्याने त्याचा खेळही बदलला आहे.”

पुढे डिव्हिलियर्स म्हणाला, “तो का निवृत्त होईल? केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणूनही त्याला अशा विक्रमासह पुढे खेळायला आवडेल. अंतिम सामन्यात ७६ धावा करून त्याने भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि संघाच्या यशाचा पाया रचला आणि जेव्हा संघ दबावात तेव्हाही त्याने आघाडी घेत नेतृत्व केले.”

रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून कामगिरीबद्दल सांगताना तो म्हणाला, “इतर कर्णधारांच्या तुलनेत रोहित शर्माच्या विजयाची टक्केवारी पाहिली तर ती जवळपास ७४ टक्के आहे, जी यापूर्वी होऊन गेलेल्या कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त आहे. तो असाच पुढे जात राहिला तर तो आतापर्यंतचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. रोहित शर्मा स्वत:देखील म्हणाला की तो निवृत्त होत नाहीये आणि अशा अफवा पसरवू नये असे त्याने सांगितले आहे.”

Story img Loader