Rohit Sharma Back To Mumbai After Winning Champions Trophy 2025: भारतीय संघाचा कर्णधार चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर मायदेशी परतला आहे. दुबईत झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेला कर्णधार रोहित सोमवारी संध्याकाळी मुंबईत आपल्या घरी परतला. यावेळी रोहितच्या स्वागतासाठी चाहत्यांची मोठी गर्दी विमानतळावर होती आणि रोहितने त्यांच्या प्रेमाबद्दल हात दाखवत सर्वांचे आभारही मानले. यावेळी रोहित शर्मा त्याच्या कुटुंबाबरोबर एकटाच माघारी परतलेलं पाहायला मिळालं आहे. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
रविवारी, ९ मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. भारताने किवी संघाचा ४ गडी राखून पराभव केला आणि १२ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. फायनलमध्ये ७६ धावा करून संघाला चॅम्पियन बनवण्यात कर्णधार रोहितने सर्वात मोठी भूमिका बजावली.
भारताच्या या ऐतिहासिक विजयाच्या एका दिवसानंतर, सोमवारी १० मार्चला संध्याकाळी रोहित त्याच्या कुटुंबासह मुंबईला परतला. नेहमीप्रमाणेच यावेळीही रोहित त्याची मुलगी समायराला उचलून घेत एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसला. रोहित शर्मासाठी एअरपोर्टवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. तर चाहत्यांनी रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती.
रोहितच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती आणि सर्वांनी भारतीय कर्णधाराच्या नावाने घोषणाबाजी करत त्याचे जोरदार स्वागत केले. रोहितला घेण्यासाठी त्याची रेंज रोव्हर कार आधीच विमानतळाबाहेर तयार उभी होती. चाहत्यांकडून झालेले स्वागत, घोषणाबाजी दरम्यान रोहित आपल्या कारमध्ये बसून घराकडे निघाला. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही रोहितचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तर काही वेळाने रोहितची पत्नी रितिका सजदेहदेखील त्यांच्या मुलासह एअरपोर्टबाहेर येताना दिसली.
टी-२० विश्वचषक २०२४ प्रमाणे यावेळी भारतीय संघ एकत्र आला नाही, उलट सर्व खेळाडू वेगवेगळे मायदेशात परतणार आहेत. कारण २९ जून रोजी टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर जशी विजयाची ओपन बस परेड आयोजित केली होती. तशी बीसीसीआयने यावेळी विजय परेडची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सर्व खेळाडू वेगवेगळे देशात परतणार आहेत आणि रोहित हा परतणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिला खेळाडू आहे.
आयपीएल २०२५ मध्ये दिसणार भारताचे स्टार खेळाडू
या विजयानंतर आता कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू पुढील काही दिवस विश्रांती घेतील आणि लवकरच मैदानात परततील. सर्व स्टार खेळाडू आता पुढील २ महिने आयपीएल २०२५ साठी सज्ज असणार आहेत. येत्या २२ मार्चपासून आयपीएलच्या १८व्या सीझनला सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.