IND vs NED Match Virat Kohli Rohit Sharma Bowling: तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि भारताच्या तर सर्वच्या सर्व मॅच बारकाईने पाहिल्या असतील तर सांगा बरं, भारताने शेवटच्या वेळी गोलंदाजीचे नऊ पर्याय कधी वापरले होते? विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हा पहिलाच सामना होता जेव्हा टीम इंडियाने गोलंदाजीमध्ये कमाल प्रयोग करून पाहिला होता. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी नेदरलँड्सविरुद्धच्या लीग सामन्याचा फायदा घेत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिलच्या हाती सुद्धा गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली होती. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध होणार्या उपांत्य फेरीसाठी भारत तयारी करत असताना भारताने अचानक हा प्रयोग करून पाहायचे का ठरवले याविषयी कर्णधार रोहित शर्माने स्पष्टीकरण दिले आहे.
हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारताचा समतोल बिघडला होता. त्याचा आतापर्यंत प्रभाव दिसला नसला तरी हा संघासाठी मोठा धक्का आहेच. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू दुखापतीने स्पर्धेतून बाहेर पडला होता. भारताने हार्दिकची जागा भरून काढताना प्लॅन बी नुसार, सूर्यकुमार यादवला स्पेशालिस्ट फलंदाजीचा पर्याय म्हणून सहाव्या क्रमांकावर आणले, तर शार्दुल ठाकूरला मोहम्मद शमीच्या जागी स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून आणण्यात आले. या योजनेनुसार भारताने स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. रविवारी, भारताने नेदरलँड्सला ४११ धावांचे बलाढ्य आव्हान दिले होते, काही प्रमाणात यामुळे भारताचा विजय सुनिश्चितच होता म्हणून आपल्याकडील फलंदाजांची गोलंदाजीत क्षमता तपासण्यासाठी हा प्रयोग करण्याचे ठरवण्यात आले होते.
“चुकीच्या पायाने इनस्विंगचा धोका” असलेल्या विराट कोहलीने सहा वर्षांत प्रथमच एका ODI सामन्यात पूर्ण षटक टाकले आणि नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सची एक विकेटही घेतली. तीन षटकांमध्ये १३ धावांत १ विकेट घेऊन विराट कोहलीने सर्वांना थक्क केलं. त्यानंतर शुभमन गिलला नंतर बोलावण्यात आले गिलने सुद्धा ऑफ-स्पिन गोलंदाजीने दोन षटकांत ११ धावा दिल्या. त्यापाठोपाठ देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३६ विकेट्स घेणारा सूर्यकुमार यादव सुद्धा मैदानात आला उजव्या हाताच्या ऑफ ब्रेक गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच दोन षटकांत १७ धावा दिल्या. अखेरीस, रोहितनेच ११ वर्षांतील पहिला एकदिवसीय विकेट घेऊन जगाला भारताच्या अष्टपैलूत्वाची झलक दाखवून दिली.
हे ही वाचा<< “बाबर आझम काय करेल, PCB नेच क्रिकेटची ***”, रमीझ राजा यांचा संताप; म्हणाले, “पैसे घेऊन..”
शेवटी रोहित शर्माने भारताच्या या प्लॅनविषयी सांगितले की. “आज आमच्याकडे नऊ (गोलंदाजी) पर्याय होते, हे महत्त्वाचे आहे, हा असा खेळ होता जिथे आम्ही काही गोष्टी करून पाहू शकलो असतो. वेगवान गोलंदाज गरज नसताना वाइड यॉर्कर टाकतात. गोलंदाजी युनिट म्हणून, आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करायचा होता आणि आम्ही काय साध्य करू शकतो ते पाहायचे होते.” बुधवारी मुंबईत होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होण्यापूर्वी भारताला दोन दिवसांची विश्रांती आहे.