Rohit Sharma reveals why he did not allow Mohammed Siraj to bowl more overs: रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक २०२३ चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर १० विकेट्सने ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याचबरोबर आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. या महत्त्वाच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाची कामगिरी केली. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजचे कौतुक केले.
या सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सात षटकांत श्रीलंकेच्या एकूण सहा विकेट्स घेतल्या. जर त्याला आणखी एक षटक टाकण्याची संधी मिळाली असती, तर तो सात विकेट घेऊ शकला असता. पण कर्णधार रोहित शर्माने त्याला तसे करण्यापासून रोखल्यामुळे तसे झाले नाही. सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्मा म्हणाला की, त्याला ट्रेनरने तसे करण्यास सांगितले होते.
..तर सिराजने स्टुअर्ट बिन्नीचा विक्रम मोडला असता –
मोहम्मद सिराजने सहावे षटक संपवताच कर्णधार रोहित शर्मा थर्ड मॅनवर त्याच्याकडे गेला आणि त्याच्याशी बोलला. सिराजला आणखी गोलंदाजी करायची होती, पण या संवादानंतर सिराजला दुसरे षटक टाकायला मिळाले नाही. त्याने सहा विकेट्स घेतल्या होत्या आणि सातवी विकेट घेऊ शकला असता. जर त्याने सात विकेट घेतल्या असत्या, तर त्याने स्टुअर्ट बिन्नीचा विक्रम मोडला असता आणि वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू बनला असता. २०१४ मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना बिन्नीने ४ षटके आणि ४ चेंडूत सहा विकेट घेतल्या होत्या.
मला ट्रेनर्सकडून संदेश मिळाला –
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने याचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की, मोहम्मद सिराजला थांबवण्यास सांगण्यात आले होते. तो म्हणाला, “त्याने ७ षटके टाकल्यानंतर मला त्याला आणखी षटके द्यावीत असे वाटत होते, पण मला माझ्या ट्रेनर्सकडून संदेश मिळाला की त्याला आता थांबवले पाहिजे.”
सिराज स्वत: गोलंदाजीबद्दल उत्साही होता –
आपल्या निर्णयाबद्दल तो अतिशय संयमीपणे म्हणाला, “सिराज स्वत: गोलंदाजीबद्दल उत्साही होता, त्याला जास्त षटकं टाकायची होती. पण कोणत्याही गोलंदाजाचा किंवा फलंदाजाचा स्वभाव असतो की, जेव्हा त्याला संधी मिळते, तेव्हा तो त्याचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्न करतो. पण इथेच माझी भूमिका येते, मला सर्व काही नियंत्रणात ठेवावे लागते. जेणेकरून कोणत्याही खेळाडूने स्वतःवर जास्त दबाव आणू नये आणि खूप थकू नये.”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, मला आठवते, जेव्हा आम्ही त्रिवेंद्रममध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळत होतो, त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. त्याने चार विकेट्स घेतल्या आणि ८-९ षटके टाकली होती. पण मला वाटते ७ षटके देखील योग्य आहेत. सामन्यात भारतासाठी तीन गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि सिराजला इतर दोघांच्या तुलनेत थोडी अधिक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. रविवारी सिराजचा दिवस होता. त्या दिवसाचा तो हिरो होता.”