Rohit Sharma and Ritika Sajdeh welcome baby boy : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने त्यांच्या मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी मीडियात येताच रोहितचे चाहते खूप खूश झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहते रोहित शर्माचे अभिनंदन करत आहेत. या जोडपे दुसऱ्यांदा पालक बनले आहे. याआधी त्यांना समायरा नावाची ६ वर्षांची मुलगी आहे. अशात आता भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-१ ने मालिका जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यातील शतकवीर संजू-तिलक आणि सूर्याने व्हिडीओ शेअर करुन रोहित शर्माला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
शुक्रवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याच्या पोस्टने एकच धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे चाहते रोहितला यासाठी शुभेच्छा देत होते. पण रोहित शर्मा किंवा त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिलेली नव्हती. मात्र टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने शुभेच्छा दिल्याने रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
रितिकाने शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला, असं हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे. मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही, यावरही चर्चा सुरू होती. मात्र मुलाच्या जन्मानंतर तो ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता आहे.रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह प्रेग्नेंट असल्याने रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धची पहिली कसोटी खेळणार नाही, असं रिपोर्ट्समध्ये समोर आलं होतं. तर रोहितने बीसीसीआयला खाजगी कारणामुळे कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले होते. पण संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होत असताना रोहित शर्मा जाणार की नाही याबाबत बोर्डाकडून कोणतीही स्पष्टता नव्हती.
u
u
आता रोहित शर्मा बाबा झाला असल्याची चर्चा सुरू झाल्याने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल आणि भारताचे नेतृत्त्व करेल असे म्हटले जात आहे. रोहित शर्मा आणि रितिकाकडून याबाबत ऑफिशियल कधी सांगितलं जाईल याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. एक्सवर तर ‘ज्युनियर हिटमॅन’ असा ट्रेंडदेखील सुरू आहे. जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला गेला तर भारताकडून सलामीसाठी कोण उतरणार हा मुद्दा मार्गी लागेल. या संदर्भात टीम इंडिया चिंतेत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून आहे.