Rohit Sharma said on Ravindra Jadeja’s demand to take DRS: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत सर्व काही ठीक झाले आहे. मग ती गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. पण आणखी एक विभाग आहे ज्यामध्ये भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे आणि तो म्हणजे डीआरएस. भारतीय कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये सातत्याने योग्य रिव्ह्यू घेतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मदत झाली आहे. रोहितच्या उत्कृष्ट डीआरएस रेकॉर्डमागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा खेळाडूंवरचा विश्वास.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा रोहितला रिव्ह्यू घेण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडतो. तो म्हणाला, “मी हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडला आहे आणि मला विश्वास ठेवू शकेल असे खेळाडू शोधायचे आहेत. मला माहित आहे की डीआरएसचा निर्णय कोणाच्याही पक्षात जाऊ शकतो. आज आम्हाला एक योग्य आणि एक चुकीचा रिव्ह्यू मिळाला.”
रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. जेव्हा रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्या सांगण्यावरून, रोहितने डीआरएस घेतला जो शेवटी भारताच्या बाजूने गेला. ही घटना १३व्या षटकातील होती, जेव्हा लेग स्टंपचा चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्नात जडेजाच्या पाचव्या चेंडूवर हेनरिक क्लासेनला फटका मारताना चुकला. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि इतर खेळाडूंनी एलबीडब्ल्यूची अपील केली. फील्ड अंपायर कुमार धर्मसेना यांनी गोलंदाजाचे अपील फेटाळले. त्यानंतर रोहितही फारसा इंटरेस्टिंग दिसत नव्हता पण जडेजा वारंवार डीआरएस घेण्यास सांगत होता.
हेही वाचा – IND vs SA: रवींद्र जडेजाने रचला इतिहास! विश्वचषकाच्या एका डावात ५ विकेट्स घेणारा ठरला दुसरा भारतीय फिरकीपटू
हा तर प्रत्येक सामन्यात म्हणतो आऊट आहे – रोहित शर्मा
त्यावेळी जडेजाची उत्सुकता पाहून रोहित गंमतीने म्हणाला, “हा तर प्रत्येक सामन्यात म्हणतो आऊट आहे.” पण यष्टिरक्षक राहुलशी थोडी चर्चा केल्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “तो एकटाच फलंदाज राहिला आहे, त्यामुळे चला घेऊया. त्यानंतर रिव्ह्यू घेतला गेला. त्यानंतर बॉल ट्रॅकिंगमध्ये असे दिसून आले की बॉल लाइनवर पिच होत होता आणि त्याचा इम्पॅक्ट देखील लाइनच्या आत होता. शेवटी बॉल लेग स्टंपला लागला. तीनही रेड लाइन मोठ्या पडद्यावर दिसू लागल्यानंतर क्लासेनला आऊट देण्यात आले.
हेही वाचा – विराटचा ‘शतकोत्सव’! सचिनच्या ४९ एकदिवसीय शतकांशी बरोबरी
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात जडेजाने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला ८३ धावांत गुंडाळले. यासह जडेजाने विश्वचषक स्पर्धेत पाच बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले. टीम इंडियाने हा सामना २४३ धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत आपले पहिले स्थान मजबूत केले.