Rohit Sharma press conference before India vs Pakistan match: भारत-पाक सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. ज्यामध्ये रोहित शर्माने शुबमन गिलबद्दल मोठी अपडेट दिली. त्याने सांगितले की गिल सामन्यासाठी ९९ टक्के फिट आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या तयारीबद्दलही माहिती दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.
शुबमन गिल ९९ टक्के उपलब्ध –
भारतीय सलामीवीराने गुरुवारी नेटमध्ये सरावाला सुरुवात केली. शुक्रवारी सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. आता कर्णधार रोहित शर्माने चित्र जवळपास स्पष्टे केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीय कर्णधाराने सांगितले की, “शुबमन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी ९९ टक्के निवडीसाठी उपस्थित राहणार आहे. उर्वरित शनिवारी पहायला मिळेल.” याचा अर्थ आता कुठेतरी त्याची खेळण्याची शक्यता वाढली आहे. रोहित आणि गिलची जोडी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकातील पराक्रमाची पुनरावृत्ती करू शकते.
तीन फिरकीपटूंसोबत जाण्याच्या प्रश्नावर काय म्हणाला रोहित?
विश्वचषकातील भारताचा हा तिसरा सामना असेल. टीम इंडियाने याआधीच दोन्ही सामने जिंकले आहेत. या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना आणि अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा सामना जिंकला. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संघाच्या गोलंदाजी संयोजनाबाबतही सांगितले. तीन फिरकीपटूंसोबत जाण्याच्या प्रश्नावर भारतीय कर्णधार म्हणाला की, ‘मी अजून खेळपट्टी पाहिली नाही. गरज पडल्यास खेळाडू पुढे येण्यास तयार आहेत.’
गेल्या ९ महिन्यांपासून सोशल मीडियावर नाही –
सोशल मीडियाबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, तो गेल्या ९ महिन्यांपासून सोशल मीडियावर नाही. बाहेरचा आवाज थांबवण्यासाठी त्याने हे केल्याचे भारतीय कर्णधाराने सांगितले. त्यांनी सांगितले की प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अहमदाबादच्या मैदानावर दव पडण्याबद्दल भारतीय कर्णधार म्हणाला की, ‘त्याचा किती परिणाम होईल हे मला माहीत नाही. चेन्नई किंवा दिल्लीत फारसा फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.’
नाणेफेकीबाबत तो पुढे म्हणाला की, ‘नाणेफेक हा फार मोठा घटक असणार नाही.’ सामन्यात प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याबाबत भारतीय कर्णधार म्हणाला की, संघासाठी जे काही सोयीचे असेल, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याबाबत तो म्हणाला की, कोणत्याही प्रकारचे दडपण नसते.
पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवरील रोहित शर्माची प्रतिक्रिया –
रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील ७-० च्या विक्रमाबद्दल सांगितले की, तो अशा विक्रमांकडे लक्ष देत नाही. तो फक्त एक संघ म्हणून चांगले क्रिकेट कसे खेळतात येईल, यावर लक्ष केंद्रित करतो. आत्तापर्यंतच्या विश्वचषकात भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभव केला आहे. दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत.