Rohit Sharma trying to sweep and reverse sweep shot : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरुमध्ये पार पडला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतक झळकावले. या सामन्यादरम्यान रोहित शर्माने रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा खूप प्रयत्न केला. यावेळी तो काही फटके मारण्यातही यशस्वी ठरला. सामन्यानंतर रोहित शर्माने याबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, गेल्या दोन वर्षांपासून तो रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न करत आहे.
मी गेल्या दोन वर्षांपासून स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे –
सामन्यानंतर जिओ सिनेमावर झालेल्या संवादादरम्यान रोहित शर्माने त्याच्या स्वीप शॉटबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी या शॉटचा खूप सराव केला आहे. गोलंदाजांवर दडपण आणायचे असेल तर असे फटके मारावे लागतात. जेव्हा चेंडू फिरतो आणि तुम्हाला तो सरळ मारता येत नाही, तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळे करावे लागते. मी गेल्या दोन वर्षांपासून स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा शॉट मी कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा खेळला आहे. तो पर्याय तुमच्याकडे असायला हवा. चेंडू ज्या पद्धतीने फिरत होता, त्यावरून सरळ खेळण्याऐवजी स्वीप करणे योग्य ठरेल, असे मला वाटले.”
भारतीय संघाने तिसर्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २१२ धावा केल्या. रोहित शर्माने ६९ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावांची खेळी साकारली. रिंकू सिंगनेही ३९ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.
यानंतर धावांचा पाठलाग करायला अफगाणिस्ताननेही चांगली फलंदाजी करत ६ गडी गमावून २१२ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हर झाली पण तीही बरोबरीत राहिली. यानंतर आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली आणि त्यानंतर सामन्याचा निकाल लागला. ज्यामध्ये भारतीय संघाने रोमहर्षक विजय मिळवला.