Rohit still can not believe that the World Cup Final was rated below average : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटी पाच सत्रात संपल्यानंतर भारतीय कर्णधाराने सामनाधिकारी आणि आयसीसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित शर्माने खेळपट्ट्यांच्या रेटिंगच्या बाबतीत आयसीसी आणि सामनाधिकारी यांच्यावर दुटप्पीपणाचा ठपका ठेवला आहे. खेळाच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, वेगवान गोलंदाजांना आवश्यकतेपेक्षा जास्त मदत करणारी खेळपट्टी दिल्याबद्दल धन्यवाद. यासोबतच भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर होत असलेल्या टीकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “विश्वचषक २०२३ च्या फायनल सामन्याच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग देण्यात आले होते, तरीही तिथे विरोधी संघाच्या फलंदाजाने शतक झळकावले होते. मी सामनाधिकाऱ्यांना विनंती करतो की, ज्या देशात ती स्पर्धा खेळली गेली होती, तिथे काय नाही ते पहा. भारतातील पहिल्याच दिवशी उडणाऱ्या धुळीबद्दल बोलायचे झाले, तर न्यूलँड्सच्या खेळपट्टीवरही भेगा पडल्या होत्या.”
रोहित शर्माने खेळपट्टीवरुन उपस्थित केले प्रश्न –
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “जेव्हा आमच्यासमोर असे आव्हान असते, तेव्हा तुम्ही येता आणि त्याचा सामना करत. भारतातही असेच घडते, परंतु, जर भारतात पहिल्याच दिवशी खेळपट्टी फिरकीला साथ द्यायला लागली, तर लोक उडणाऱ्या धुळीबद्दल बोलायला सुरुवात करतात. आता या खेळपट्टीवर खूप भेगा पडलेल्या आहेत त्याकडे लक्ष दिले जात नाही.” रोहितने सामनाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी भारतात झालेल्या विश्वचषकातील खेळपट्ट्यांना दिलेल्या काही रेटिंगवरही प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला, “मला वाटते की आपण जिथेही जातो तिथे तटस्थ राहणे महत्त्वाचे आहे. विशेषत: सामनाधिकाऱ्यांनी रहावे. तुम्हाला माहिती आहे की, यापैकी काही सामनाधिकाऱ्यांना ते खेळपट्ट्यांचे मूल्यांकन कसे करतात यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण हे खूप महत्त्वाचे आहे.”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “मला अजूनही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिले गेले, यावर विश्वास बसत नाही. अंतिम सामन्यात एका विरोधी संघाच्या फलंदाजाने शतक झळकावले. ती खेळपट्टी खराब कशी असू शकते? या त्या गोष्टी आहेत, ज्यावर आयसीसी आणि सामनाधिकारी यांनी खेळपट्टीला रेटींग देताना ती खेळपट्टी कोणत्या देशातील आहे, हे न पाहता खेळपट्टीची पाहणी करुन त्यावर आधारित त्यांना रेटिंग द्यावे. मला आशा आहे की ते त्यांचे कान उघडे ठेवतील, ते डोळे उघडे ठेवतील आणि खेळाच्या त्या पैलूंकडे पाहतील. खरे सांगायचे तर मी अशा खेळपट्ट्यांच्या बाजूने आहे. अशा खेळपट्ट्यांवर आम्हाला आव्हान द्यायचे आहे. आम्हाला न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर खेळल्याबद्दल अभिमान आहे. पण मला एवढेच सांगायचे आहे की, तटस्थ रहा.”