विश्वविजेत्या विंडीजविरुद्धची टी२० मालिका भारताने ३-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत विजय मिळवला. विंडीजचा संघ तुलनेने दुबळा असूनही विंडीजने भारताला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा हा सोपा नसेल हे भारतीय संघाला कळून चुकले आहे. त्यातच ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन चांगली कामगिरी करणे हे कायमच आव्हानात्मक असते, असे सूचक वक्तव्य भारतीय संघाचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा याने केले आहे.

रविवारी भारताने विंडीजवर ६ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या भारतीय उपखंडापेक्षा वेगळ्या आहेत. तिथे जाऊन चांगली कामगिरी करणे हे कायमच आव्हान असते. ऑस्ट्रेलियात खेळताना खेळाडू आणि संघाचा कस लागतो. कारण हा दौरा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा असतो. त्यातच विंडीजसारख्या संघाला व्हाईटवॉश दिल्यानंतर संघ विश्वासाने परिपूर्ण असतो. हा विश्वास नव्या दौऱ्यावर कायम ठेवणे हे खरे आव्हान असते. पण आम्ही आमच्या कामगिरीत सातत्य राखले तर ते शक्य होऊ शकले, असेही तो म्हणाला.

याशिवाय, शिखर धवनच्या खेळीचेही त्याने कौतुक केले. ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या दौऱ्याआधी शिखरला सूर गवसला ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळत होती, पण त्याचे मोठ्या धावसंख्येचा रूपांतर करणे त्याला शक्य होत नव्हते. पण अखेर शेवटच्या सामन्यात त्याला सूर गवसला ही सकारात्मक बाब आहे, असेही रोहितने सांगितले.

Story img Loader