Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter’s Birth: रोहित शर्माने नुकत्याच एका पोडकास्टमध्ये त्याच्या लेकीच्या जन्माच्या वेळेचा एक प्रसंग सांगितला. २०१८ मध्ये रोहितची लेक समायराचा जन्म झाला तेव्हा रोहित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये होता. ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने रोहित त्याच्या लेकीच्या जन्माच्या वेळेस उपस्थित नव्हता. रोहितला जेव्हा प्रसिध्द मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं तेव्हा रोहितने हा किस्सा सांगितला.
रोहित शर्मा २०१८ मध्ये पहिल्यांदा बाबा होणार होता आणि मेलबर्न कसोटीनंतर आपल्या मुलीच्या जन्मासाठी भारतात येणार होता पण तसे होऊ शकले नाही. रोहितला बोर्डाकडून सुट्टीदेखील मिळाली होती पण ऑस्ट्रेलियामुळे असं काही घडलं की त्याला येता आलं नाही आणि त्याच्या आयुष्यातील एक खास क्षण त्याला अनुभवता आला नाही.
भारत त्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत होता आणि त्यांना विजयासाठी फक्त दोन विकेट्सची गरज होती आणि त्याचवेळी पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामना संपण्यासाठी उशीर झाला. भारताने अखेरीस या सामन्यात विजय मिळवला पण रोहित खूप निराश होता, कारण वेळेत न पोहोचल्याने त्याला विमान पकडण्यास उशीर झाला होता आणि त्याच्या कुटुंबाजवळ तो वेळेवर पोहोचू शकला नव्हता. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्यावेळी पत्नीसोबत नसल्याची त्याला खंत वाटत असल्याचे त्याने सांगितले. सामना संपताच रोहित थेट मैदानातून विमानतळावर पोहोचला आणि विमानाने घरी परतला.