२ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. गेल्या काही मालिकांमध्ये सतत अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला यंदा निवड समितीने डच्चू देत रोहित शर्माला सलामीवीराची संधी दिली. सध्या रोहितवर सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवण्यासाठी मोठा दबाव आहे. मात्र भारतीय संघाचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने रोहित शर्माला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
अवश्य वाचा – पहिल्याच प्रयत्नात ‘हिटमॅन’ अपयशी, भोपळाही न फोडता परतला माघारी
लक्ष्मण आपल्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीतला भक्कम फलंदाज होता. १९९६-९८ च्या काळात लक्ष्मणला भारतीय संघात सलामीच्या जागेवर येण्याची संधी दिली होती. मात्र या जागेवर लक्ष्मण कधीही यशस्वी ठरला नव्हता. “माझ्या मते रोहित शर्माकडे सध्या सर्वात जमेची बाजू आहे ती म्हणजे अनुभव, माझ्याकडे तो नव्हता. ४ कसोटी सामने खेळल्यानंतर लगेचच माझ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी आली. रोहित गेली १२ वर्ष आंतररराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. त्यातच तो सध्या चांगल्या फॉर्मातही आहे.” लक्ष्मण माजी भारतीय यष्टीरक्षक दीप दासगुप्ताच्या ‘Deep Point’ या यू ट्युब चॅनलवर लक्ष्मण बोलत होता.
मला ज्यावेळी सलामीला येण्याची संधी मिळाली त्यावेळी मी केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे मी माझ्या शैलीत बदल केला. मधल्या फळीत खेळत असताना मी फ्रंट फूटवर खेळत होतो. मात्र यानंतर सलामीला येताना मी सिनीअर आणि प्रशिक्षकांशी चर्चा करत मी माझ्या शैलीमध्ये बदल केला. मला अशी आशा आहे की रोहित ही चूक करणार नाही. तुम्ही तुमच्या नैसर्गिक शैलीला मुरड घालून खेळायचा गेलात तर लय बिघडवून बसता. रोहितच्या बाबतीत असं झालं तर सगळंच कठीण होईल, लक्ष्मण रोहितच्या फलंदाजी शैलीबद्दल बोलत होता. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.