Rohit Sharma, Kapil Dev And Dilip Vengsarkar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) मराठी भाषा दिनानिमित्त नुकतेच मुंबईत ‘अभिजात मराठी भाषा दिन गौरव सोहळा २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात राम सुतार, मधु मंगेश कर्णिक, अशोक सराफ, दिलीप वेंगसरकर, सयाजी शिंदे, वैशाली सामंत आणि इंद्रनील चितळे यासारखी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर आली होती. मराठी भाषेची वृद्धी आणि संवर्धनासाठी आपापल्या क्षेत्रातून दिलेल्या योगदानाबद्दल या मान्यवरांना राष्ट्रवादीकडून (अजित पवार) गौरविण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी असतानाही, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भाषणाने. यावेळी कर्नल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप वेंगसरकर यांनी, त्यांना कर्नला नाव कसे मिळाले ते भारतीय संघातील खेळाडूही त्यांच्यामुळे कसे मराठी बोलायला शिकले याचा किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हे कसे उत्तम मराठी बोलातात यावरही भाष्य केले.
आमचे मराठी ऐकून कपिल देवही…
या कार्यक्रमात बोलताना दिलीप वेंगसरकरांनी भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव कसे मराठी बोलायला शिकले याबाबत किस्सा सांगितला. ते म्हणाले, “मी मुंबई संघाकडून खेळायचो तेव्हा संघात सगळे मराठी होते. आम्ही मराठीतच बोलायचो. जेव्हा भारतीय संघात माझा समावेश झाला तेव्हा संघात पाच ते सहा खेळाडू मराठी होते. आम्ही सर्वजण फक्त मराठीतच बोलायचो. त्यामुळे आमचे ऐकून ऐकून कपिल देव आणि इतर खेळाडूही मराठी शिकले. आज आपल्या मुंबई संघात असलेले रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरही अस्सलखीत मराठी बोलतात. त्यामुळे मराठी बोला, वाचा, ऐका आणि आपली मराठी भाषा संस्कृती जोपासा.”
कर्नल टोपन नावामागची गोष्ट
यावेळी कर्नल टोपननावाची गोष्ट सांगताना दिलीप वेंगसरकर म्हणाले, मला कर्नल म्हणून ओळखले जाते, पण ही पदवी वगैरे नाही. मी जेव्हा १८ व्या वर्षी मुंबई रणजी संघात आलो तेव्हा मला स्कोअरिंग करायला सांगयचे. आमची मुंबईची टीम इतकी स्ट्राँग होती की, त्यामध्ये सुनील गावसकर, एकनाथ सोलकर, अशोक मंकड आणि कर्सन घावरी यांच्यासारखे एकापेक्ष एक उत्तम क्रिकेटपटू होते. त्यामुळे मला संधी मिळत नव्हती. पुढे मी १९ वर्षांचा झालो तेव्हा मला इराणी चषकात खेळण्याची संधी मिळाली. कारण सामन्याच्या आदल्या दिवशी एकनाथ सोलकर यांना दुखापत झाली. त्याच सामन्यात मी बिशनसिंग बेदी व इरापल्ली प्रसन्न यांना सात षटकार मारले आणि ७० चेंडूत शतक केले. तेव्हा हा सामना पाहण्यासाठी आलेले लाला अमरनाथ म्हणाले हा कर्नल नायडूंसारखा खेळतो. त्यामुळे मला कर्नल पदवी वगैरी मिळालेली नाही, हे सांगू इच्छितो.”