Rohit Sharma in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात क्रिकेट किंग्डम अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा राशीन येथे आला होता. राशीनमध्ये असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत वरील दोन्ही वास्तूंचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठीत भाषण करत असताना रोहित शर्माने चाहत्यांची मनं जिंकली.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला, मी राशीनमध्ये आलो, याचा आनंद वाटतोय. मागच्या तीन महिन्यात आमच्या आयुष्यात बरंच काही झालं. टी-२० विश्वचषक जिंकणं, हे आमचं ध्येय होतं. विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडतो. राशीनमध्ये आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करत आहोत आणि मला खात्री आहे की, पुढचे यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल हे इकडूनच येणार.

हे वाचा >> Karjat Jamkhed Assembly Constituency: कर्जत-जामखेड विधानसभा; काका-पुतण्याच्या संघर्षाचा नवा आखाडा! यंदा आमदार कोण, राम शिंदे की रोहित पवार?

आमदार रोहित पवार यांनी यावेळी रोहित शर्माला काही प्रश्न विचारले. राशीनमध्ये श्री माता अंबाबाईचे मंदिर आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आणि ग्रामीण भाग पाहून कसं वाटलं? असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा म्हणाला की, मला पवित्र वाटत आहे. मी गाडीमधून येत असताना मला इकडचा ग्रामीण भाग पाहून आनंद वाटला. या क्रिकेट अकदामीच्या माध्यमातून मी इथे पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहे.

तसेच भारताला आणखी एक विश्वचषक हवा आहे आणि विश्वचषक जिंकणारा कर्णधार रोहित शर्माच असायला हवा, अशी इच्छा रोहित पवार यांनी व्यक्त केली.