Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरूध्दच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने एक खणखणीत उत्तर दिले आहे. बेन डकेटने यशस्वी जैस्वालच्या शानदार खेळीचे श्रेय इंग्लंडला दिले पाहिजे, असं तो म्हणाला होता. यावर रोहितने वक्तव्य करत ऋषभ पंतची आठवण करून दिली.
भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरूध्दच्या या कसोटी सामन्यात शानदार फॉर्मात आहे. जैस्वालने इंग्लंडचा उत्कृष्ट आणि अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनची पार धुलाई केली. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत सलग दुहेरी शतक झळकावले. राजकोट कसोटीत यशस्वीने दुसऱ्या इनिंगमध्ये १२ षटकारांच्या मदतीने दुहेरी शतक पूर्ण केले. याच कसोटीदरम्यान इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने यशस्वीच्या फलंदाजीचे क्रेडिट इंग्लंडच्या बॅझबॉलला द्यावे असं म्हणाला.
ब्रँडन मॅक्युलम इंग्लंड संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर संघाने कसोटीतही वेगाने म्हणजेच टी-२० स्टाईलमध्ये झटपट धावा करण्यास सुरूवात केली, यालाच बॅझबॉल असे म्हणतात.इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट म्हणाला, “जेव्हा प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू असे (यशस्वीसारखे) शानदार खेळताना पाहतो तेव्हा असं वाटतं की याचे श्रेय आम्ही (इंग्लंड संघ) घेतले पाहिजे. कारण ते आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा आणि इतर खेळाडूंपेक्षा वेगळे क्रिकेट खेळतात.”
बेन डकेटच्या या वक्तव्यावर रोहितला प्रश्न विचारला असता त्याने एकदम भन्नाट उत्तर दिले आहे. रोहित म्हणाला, “आमच्या भारतीय संघात ऋषभ पंत नावाचा खेळाडूही होता. कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिले नसावे.” याच मुद्द्यावर पुढे बोलत असताना रोहित म्हणाला, प्रामाणिकपणे सांगू तर बॅझबॉल म्हणजे काय मला माहित नाही, बॅझबॉल म्हणजे स्ट्राईक की अजून काही मला या शब्दाचा अर्थच माहित नाही.”
भारात आणि इंग्लंडमधील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना ७ ते ११ मार्च या दरम्यान खेळवला जाणार आहे. भारताने पहिल्या कसोटीत पराभव पत्करल्यानंतर पुढील तिन्ही कसोटीत शानदार पुनरागमन करत सलग तीन विजय मिळवले. यासह भारताने ३-१ अशा फरकाने इंग्लंडविरूध्दची कसोटी मालिका आपल्या नावे केली आहे.