Rohit Sharma Statement on India Defeat: न्यूझीलंडविरूद्ध बेंगळुरूमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने पुणे कसोटीही गमावली. यासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-० ने कब्जा केला. न्यूझीलंडने भारतात मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे कसोटी सामन्यात टीम इंडियाला खराब कामगिरीचा फटका बसला, त्यामुळे भारताला ११३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर रोहित शर्मा नाराज दिसला आणि त्याने मोठं वक्तव्यही केलं आहे. रोहितनेही सामन्यानंतर केलेल्या वक्तव्यात पराभवाची अनेक कारणे सांगितली.
भारताच्या मोठ्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्माने भारताच्या पराभवानंतर बोलताना सुरूवातच निराशाजनक या शब्दाने केली आहे. हा पराभव निराशाजनक असल्याचे सांगत रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही अशा पराभवाची अपेक्षा केली नव्हती. याचे श्रेय न्यूझीलंडला जाते, ते आमच्यापेक्षा खूप चांगले खेळले. आम्ही संधीचा फायदा घेण्यात कुठेतरी अपयशी ठरलो. आम्ही त्या आव्हानांवर मात करण्यात अयशस्वी झालो, म्हणूनच आज आम्ही या वळणावर उभे आहोत. माझ्या मते, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. जिंकण्यासाठी तुम्हाला २० विकेट्स घ्याव्या लागतात. होय, पण त्यासाठी फलंदाजांना फलकावर धावसंख्याही उभारावी लागते.”
हेही वाचा – Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कसोटीत घडवला नवा इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “त्यांना (न्यूझीलंड) तिसऱ्या दिवशी २५० धावांवर रोखत आम्ही चांगले पुनरागमन केले होते, परंतु आम्हाला माहित होते की ते आव्हान असणार मोठे आहे. जेव्हा त्यांनी डावाला सुरूवात केली तेव्हा त्यांची धावसंख्या ३ बाद २०० होती आणि त्यांना २५९ धावांवर बाद करत आम्ही चांगले पुनरागमन केले. खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नव्हती. इतकंच की आम्ही फक्त चांगली फलंदाजी केली नाही. जर आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली असती आणि अपेक्षित धावसंख्येच्या जवळ पोहोचलो असतो तर कदाचित आता परिस्थिती वेगळी असती.”
रोहित शर्माने पुढे म्हटले की, “आम्हाला वानखेडेवर चांगली कामगिरी करून ती कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे संपूर्ण संघाचे अपयश आहे. मी फक्त फलंदाज किंवा गोलंदाजांना दोष देणार नाही. आम्ही चांगल्या योजनांसह आणि चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने वानखेडेमध्ये खेळण्यासाठी उतरू.”