IND vs SL 2nd ODI Highlights: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला ३२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यासह टीम इंडिया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लेगस्पिनर जेफ्री व्हँडरसेच्या सहा विकेट्समुळे भारतीय संघ २०८ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ३२ धावांनी झालेला पराभव दु:खद असल्याचे सांगून मधल्या षटकांमध्ये फलंदाज कशा पद्धतीने खेळले यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीच्या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र हे दोघे बाद होताच भारतीय फलंदाजी बाजू कोसळताना दिसली. रोहितने ६४ आणि गिलने ३५ धावा केल्या. याशिवाय केवळ अक्षर पटेलला ४४ धावा करता आल्या. बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. या सामन्यात श्रीलंकेकडून जेफ्री व्हँडरसेने १० षटकांत ३३ धावा देत ६ विकेट घेतले. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले की, “जेव्हा तुम्ही सामना गमावता तेव्हा वाईट वाटतं. हे केवळ त्या १० षटकांपुरते नाहीय ज्यात भारताने ५० धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. आम्हाला सातत्यपूर्ण क्रिकेट खेळावे लागेल आणि आम्ही ते करण्यात अपयशी ठरलो. थोडे निराश आहोत पण अशा गोष्टी घडतात. तुम्हाला खेळपट्ट्यांशी जुळवून घ्यावे लागेल. डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या संयोजनामुळे स्ट्राईक रोटेट करणे सोपे जाईल असे आम्हाला वाटले. पण श्रेय जेफ्री व्हँडरसेला जाते, त्याने सहा विकेट घेतल्या.”
हेही वाचा – IND vs SL: वॉशिंग्टन सुंदरने असं काय केलं? ज्यामुळे रोहित शर्मा लाइव्ह सामन्यात मारायला धावला, पाहा VIDEO
IND vs SL: सर्व फलंदाज फेल होत असताना रोहितने कसं केलं अर्धशतक?
इतर सर्व फलंदाज अपयशी ठरत असताना रोहितने अर्धशतक कसे झळकावले याबद्दल सांगताना तो म्हणाला, “मी ६५ धावांची खेळी करू शकलो कारण म्हणजे मी ज्याप्रकारे फलंदाजी केली. जेव्हा मी अशी फलंदाजी करतो तेव्हा खूप जोखीम पत्करावी लागते. जर तुम्ही सीमारेषा ओलांडून खेळला नाहीत तर निराशा येते. मला माझ्या खेळाशी तडजोड करायची नव्हती.”
खेळपट्टीबद्दल आणि खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगताना रोहित म्हणाला, “आम्हाला ही खेळपट्टी कशी आहे माहितीय, मधल्या षटकांमध्ये ही खरोखर कठीण होती. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आम्ही चांगले खेळू शकलो नाही. आम्ही कसे खेळलो यावर जास्त काही बोलणार नाही, पण मधल्या षटकांमध्ये संघाच्या फलंदाजीबद्दल नक्कीच चर्चा होईल.”