Rohit Sharma Statement on India win Against Australia: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या संपूर्ण संघाने सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत ४ विकेट्सने विजय मिळवला. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत यासह पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताचा विजय पाहून टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम कमालीचा आनंद होता. तर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही मोठं हसू उमटलं होतं. भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, पाहूया.

सामन्यादरम्यान आपल्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून विजयानंतर कर्णधार रोहित शर्माही खूप आनंदी दिसत होता. सामन्यानंतर तो म्हणाला, “सामन्याचा शेवटचा चेंडू टाकेपर्यंत काहीही निश्चित नव्हतं. भारताच्या डावात आम्ही जसजसे पुढे सरकलो तेव्हा जाणवलं ही धावसंख्या गाठण्याजोगी आहे. ही खेळपट्टी आपल्याला स्वातंत्रपणे हवे तसे फटके खेळू देत नाही. असं असूनही आम्ही फलंदाजीत चांगली कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही शांत आणि संयमी राहिलो, ज्याचा फायदा झाला.”

खेळपट्टीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “खेळपट्टी पूर्वीच्या सामन्यांपेक्षा फलंदाजीसाठी चांगली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या तुलनेत आज खेळपट्टी चांगली दिसत होती. आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत आणि मैदानात खेळताना त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मला नेहमीच संघात सहा गोलंदाजी पर्याय हवे होते आणि त्याचबरोबरी फलंदाजीची खोली ठेवण्याची योजना माझ्या डोक्यात होती.”

लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा भारतीय फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. रोहित शर्माने त्याचे कौतुक केले आणि म्हणाला, “तो अनेक वर्षांपासून अशीच कामगिरी करत आला आहे. फलंदाजी करताना आम्ही शांत होतो. संघाला मोठ्या भागीदारीची गरज होती, जी विराट आणि श्रेयसने रचली आणि जी खूप महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर अक्षर आणि विराट, विराट आणि राहुल यांच्यातील छोट्या छोट्या भागीदारी मॅचविनिंग ठरल्या. शेवटच्या क्षणांमध्ये हार्दिकचे ते मोठे फटके खूप महत्त्वाचे होते.”

भारतीय संघातील खेळाडूंच्या फॉर्मबद्दल रोहित म्हणाला, “जेव्हा तुम्ही अंतिम फेरीच्या शर्यतीत असता तेव्हा तुमचे सर्व खेळाडू लयीत असले पाहिजेत, अशीच इच्छा असते. सर्व खेळाडूंनी योगदान दिले आहे आणि ही गोष्ट संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. अंतिम फेरीत समोर कोण असेल याचा आम्ही जास्त विचार करणार नाही. दोन्ही संघ (दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड) चांगले आहेत. त्यामुळे त्यांनी उपांत्य फेरीपर्यं गाठली आहे. आमचं या सामन्यावर लक्ष असेल पण संघाने थोडा ब्रेक घेऊन विश्रांती घेतली पाहिजे. ही स्पर्धा अतिशय ताण देणारी होती. त्यामुळे ब्रेक घेऊन नंतर फायनलवर लक्ष केंद्रित करणे चांगलं ठरेल.”

Story img Loader