Rohit Sharma Statement on Drop Catch of Axar Patel Hattrick ball: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या मोहिमेची सुरूवात भारताने विजयाने केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी आणि शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने हा विजय नोंदवला. याशिवाय या सामन्यातील मोठा लक्षवेधी क्षण म्हणजे रोहितमुळे अक्षर पटेलची हुकलेली हॅटट्रिक.
बांगलादेशच्या डावात अक्षर पटेल ९वे षटक टाकत होता. हे षटक टाकताना त्याने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट घेतले होते. तिसऱ्या चेंडूवरही तो विकेट घेणार होता, पण पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितकडून तो झेल सुटला आणि अक्षरची हॅटट्रिक हुकली. भारताच्या विजयानंतर बोलताना रोहित शर्मा काय म्हणाला जाणून घेऊया.
भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, “जसजसा सामना पुढे जात होता, वेगवेगळे विचार येत होते. पण या ड्रेसिंग रूममधील खेळाडू खूप अनुभवी आहेत. केएल राहुल आणि गिलने उत्कृष्ट कामगिरी कली. एकच सामना झाल्यानंतर खेळपट्टी कशी आहे सांगणं अवघड आहे. परिस्थितीप्रमाणे खेळत आपण काय करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आम्ही येथील परिस्थिती संघ म्हणून नीट समजून घेतली आहे.”
शमी आणि गिलच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “शमीसाठी खूप आनंदी आहे. याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. तो काय खेळाडू आहे आणि त्याचं संघात असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहित आहे. जेव्हा संघाला गरज असते तेव्हा त्याच्यासारखे खेळाडू जबाबदारी घेऊन खेळतील अशा खेळाडूंची गरज आहे. गिल तर आपल्याला माहित आहेच. त्याची खेळी अजिबातच चकित करणारी नव्हती. तो शेवटपर्यंत खेळत राहिला हे पाहून खूप बरं वाटलं.”
अक्षर पटेलच्या हॅटट्रिकच्या चेंडूवर झेल सोडल्याबाबत बोलताना रोहित म्हणाला, “मी उद्या अक्षरला डिनरला घेऊन जाईन. नाही खरंतर तो एक सोप्पा झेल होता. मी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे ती पाहता मी तो झेल पकडलाच पाहिजे होता. पण अशा गोष्टी घडतात. ह्रदय आणि जाकिरला याचं श्रेय जातं, ज्याप्रमाणे त्यांनी भागीदारी रचली.”
It was a simple catch, but Rohit Sharma dropped it… Heartbreaking for Axar Patel. pic.twitter.com/mddZh4M8cS
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) February 20, 2025
अक्षर पटेलने देखील रोहित शर्माने झेल सोडल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितलं. अक्षरला वाटलं रोहित तो झेल टिपणार आणि त्यामुळे त्याने सेलिब्रेशन सुरू केलं पण रोहितने झेल सोडताच तो वळला आणि निघून गेला. रोहित शर्माने झेल सोडताच जमिनीवर हात आपटत स्वत:वरच राग काढला आणि त्यानंतर त्याने हात जोडून अक्षर पटेलची माफीही मागितली.