Rohit Sharma statement on India win: विराट कोहलीचं शतक, शुबमन गिल-श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण संघ मोठी धावसंख्या न करता २४१ धावांवरच सर्वबाद झाला. तर भारतीय संघाने प्रत्युत्तरात ४२.३ षटकांत २४४ धावा करत दणदणीत विजय मिळवला.
२४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने शतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने विराट कोहलीला चांगली साथ देत पाकिस्तानच्या गोलंदाजांना टिकू दिले नाही. तर रोहित शर्माने चौकार-षटकारांसह भारताला चांगली सुरूवात करून दिली.
भारताच्या फलंदाजीपूर्वी भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानला धावा करू दिल्या नाहीत. पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ विकेट गमावत ५७ धावा केल्या. पण ११ ते २० या षटकांत टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी आणि वेगवान गोलंदाजांनी अशी काही गोलंदाजी केली की रिझवान आणि सौद शकील अवघ्या २८ धावा करू शकले. शकील आणि रिझवानने शतकी भागीदारी केली खरी पण भारताच्या गोलंदाजांवर हावी होऊ शकले नाहीत.
रोहित शर्माचं भारताच्या विजयावर मोठं वक्तव्य
भारताच्या विजयानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीने चेंडूने सुरुवात केली ती चमकदार होती. कमी धावसंख्येवर पाकिस्तानला रोखणं म्हणजे गोलंदाजी युनिटने खरोखरच चांगली कामगिरी केली. प्रकाशात फलंदाजी थोडी चांगली होते हे आम्हाला माहीत होते. पण आम्ही आमच्या अनुभवाचा उपयोग करत फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. याचे श्रेय अक्षर, कुलदीप आणि जडेजा या खेळाडूंना जाते. ज्यांनी मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. रिझवान-शकीलने चांगली भागादारी रचली पण आम्हाला त्यांना सामन्यावरची आमची पकड कमी करू द्यायची नव्हती.”
रोहित पुढे म्हणाला, “खेळ निसटू न देणं महत्त्वाचे होते. हार्दिक, शमी आणि हर्षित यांनीही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तेही विसरता कामा नये. आपण जर गोलंदाजी युनिटची कामगिरी पाहिली तर प्रत्येक खेळाडूने पुढे येत विकेट घेतले आणि जे खूप महत्त्वाचं होतं. ही सगळी मुलं, या फॉरमॅटमध्ये आम्ही एकत्र खूप खेळलो आहोत. मुख्य म्हणजे हा फॉरमॅट आणि त्यांना त्यांची जबाबदारी चांगली माहित आहे. कधीकधी सर्वच गोलंदाजांना १० षटकं टाकण्याची संधी मिळत नाही, कारण सहा गोलंदाज संघात आहेत. अक्षर-कुलदीपने आज चांगली कामगिरी केली. गेल्या सामन्यात जडेजाने कामगिरी केली होती.”
Innings Break!
— BCCI (@BCCI) February 23, 2025
A fine bowling display from #TeamIndia and Pakistan are all out for 2⃣4⃣1⃣
3⃣ wickets for Kuldeep Yadav
2⃣ wickets for Hardik Pandya
A wicket each for Axar Patel & Ravindra Jadeja
Over to our batters ?
Scorecard ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND |… pic.twitter.com/Xo9DGpaIrX
रोहित शर्मा विराट कोहलीच्या शतकाबाबत काय म्हणाला?
विराट कोहलीबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “त्याला देशाचं प्रतिनिधित्व करायला आवडतं. त्याला मैदानावर जात संघासाठी खेळायचं असत. गेल्या काही वर्षांत त्याने हीच कामगिरी करताना आपण पाहिलं आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या कोणालाच त्याच्या या खेळीच आश्चर्य वाटले नाही.”