IND vs ENG 2nd ODI Highlights in Marathi: रोहित शर्माला सूर गवसला अन् भारताने कर्णधाराच्या शतकाच्या जोरावर इंग्लंड संघाचा ४ विकेट्सने पराभव केला. या पराभवासह भारताने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी मिळवत मालिकादेखील आपल्या नावे केली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने विजयाचा पाया रचला. तत्पूर्वी इंग्लंडच्या डावात जडेजाने ३ विकेट्स घेत इंग्लंडच्या धावांवर वचक बसवला. रोहित शर्माला त्याच्या ११९ धावांच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. रोहित शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून वाईट फॉर्ममधून जात होता. चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर आलेली असताना कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत होता. पण रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात चौकार षटकारांच्या आतिषबाजीसह ११९ धावांची धुव्वाधार खेळी करत सर्वांची बोलती बंद केली आणि फॉर्म दाखवून दिला. सामन्यानंतर रोहित शर्माने त्याच्या फलंदाजीबाबत काय सांगितलं, जाणून घेऊया.
रोहित शर्मा सामनावीर ठरल्यानंतर त्याच्या फलंदाजीबाबत आणि भारताच्या विजयाबाबत बोलताना म्हणाला, “संघासाठी मैदानात धावा करून खूप छान वाटतंय. मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना होता. मला कशी फलंदाजी करायची आहे, याचं मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वर्गीकरण केलं होतं. हा अलसा फॉरमॅट आहे जो टी-२० पेक्षा मोठा आहे आणि कसोटी क्रिकेटपेक्षा थोडा छोटा, त्यामुळे मला यात धावा करायच्या होत्याच. मला शक्य तितका वेळ फलंदाजी करायची होती आणि यावरच माझा पूर्ण फोकस होता.”
खेळपट्टीबद्दल आणि फटकेबाजीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “काळ्या मातीपासून तयार झालेल्या खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडल्यानंतर निसरड्या पद्धतीने बॅटवर येतो. त्यामुळे पूर्ण बॅटने चेंडू खेळणं गरजेचं होतं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने आक्रमण केलं जेणेकरून मोठे फटके मारण्यासाठी मला मोकळीक मिळू नये. पण मी यासाठी तयार होतो, माझा प्लॅन तयार होता आणि त्यानुसार प्रत्युत्तर दिलं. साहजिकचं सुरूवातीला गिलकडून आणि नंतर श्रेयसकडून चांगली साथ मिळाली.”
![Rohit Sharma Player of the match](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_1dae71.png)
रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सलामीवीर म्हणून आजपर्यंत अनेक उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. गिलबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “आम्ही एकमेकांबरोबर फलंदाजी करताना त्याचा आनंद घेतो. गिल हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मी त्याला खेळताना जवळून पाहिलं आहे आणि तो परिस्थिती पाहून डगमगत नाही आणि असंही आकडे तर पाहतच आहोत. “
फिरकीपटूंच्या मधल्या षटकांतील गोलंदाजीबाबत बोलताना रोहित म्हणाला, “मधल्या षटकातील भेदक गोलंदाज खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सामन्याचा रोखही बदलू शकतो. जर मधल्या षटकांमध्ये तुम्ही धावांवर अंकुश ठेवलात तर अखेरच्या षटकांमध्ये फारसा ताण येत नाही. दोन्ही सामन्यांमध्ये, नागपूरच्या वनडेमध्ये मधल्या षटकांमध्ये गोलंदाजांनी धावांवर वचक बसवला आणि या सामन्यातही तेच केलं. जेव्हा मधल्या षटकांमध्ये विकेट्स मिळतात तेव्हा प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकता येतो.”
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आणि अखेरच्या सामन्यापूर्वी कोणत्या विभागांमध्ये भारतीय संघाला सुधारण्याची गरज आहे, असं रोहित शर्माला विचारताच कर्णधार म्हणाला, “आम्हाला एक संघ म्हणून सातत्याने चांगली कामगिरी कशी करू, यावर लक्ष द्यायचं आहे. गेल्या सामन्यानंतर मी म्हणालो होतो की, आम्हाला संघ आणि खेळाडू म्हणून सातत्याने सुधारणा करत राहायची आहे. जोपर्यंत कर्णधार-कोच काय सांगत आहेत आणि सर्वांना आपली काय जबाबदारी आहे, याची स्पष्टता आहे. हे सर्व ते अंमलात आणत आहेत तोपर्यंत फार काही विचार करण्याची गरज नाही.”
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला तर दुसरा सामनाही ४ विकेट्सने जिंकला. यासह भारताने २-० ने मालिकेत अभेद्य आघाडी मिळवत मालिका जिंकली. आता भारताचा या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे.