Rohit Sharma Statement on India Win: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर कब्जा केला. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आणि पाचही सामने जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली.. अंतिम सामन्यातही भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. भारताच्या या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊया.

अंतिम सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केएल राहुल आणि वरुण चक्रवर्तीचे कौतुक केले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मोठ्या संख्येने पोहोचलेल्या चाहत्यांचेही रोहितने आभार मानले. रोहित शर्माने त्याच्या मॅचविनिंग खेळीबद्दलही सांगितले. रोहितने अंतिम फेरीत ७६ धावा करत विजयाचा पाया रचला.

रोहित शर्मा म्हणाला, “ज्यांनी संघाला इथे उपस्थित राहून पाठिंबा दिला त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. इथली गर्दी विलक्षण होती. हे आमचे होम ग्राउंड नाही, पण चाहत्यांनी ते आमचे होम ग्राउंड बनवले. आम्हाला खेळताना पाहण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या चाहत्यांची संख्या आणि सामन्याचा निकाल समाधानकारक आहे. फक्त या सामन्यात नाही, प्रत्येक सामन्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे फिरकीपटू कशी कामगिरी करतात यावर नजर होती. जेव्हा तुम्ही अशा खेळपट्टीवर खेळत असता तेव्हा अपेक्षा खूप जास्त असतात आणि संघाच्या फिरकी विभागाने कधीच निराश केले नाही.”

रोहित केएल राहुलचं कौतुक करताना म्हणाला, “तो प्रचंड हुशार आहे. सामन्यातील दबावामुळे तो कधीच खचत नाही. त्यामुळे आम्हाला त्याला मधल्या फळीत ठेवायचे होते. जेव्हा तो फलंदाजी करतो आणि परिस्थितीनुसार योग्य शॉट्स खेळतो तेव्हा तो हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो. संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी केली.”

रोहित शर्मा वरूण चक्रवर्तीबाबत म्हणाला, “त्याच्यामध्ये काहीतरी खास आहे. अशा खेळपट्टीवर जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा फलंदाजांनी त्याच्याविरूद्ध आक्रमक फलंदाजी केली पाहिजे असे वाटत असते आणि तेव्हाच तो अधिक घातक ठरतो आणि अगदी म्हणूनच त्याची संघात निवड केली होती. तो स्पर्धेच्या सुरूवातीला खेळला नव्हता, पण जेव्हा तो न्यूझीलंडविरूद्ध खेळला आणि त्याने ५ विकेट्स घेतले तेव्हा चेंडूने तो कशी कामगिरी करतो याचा अधिक अंदाज आला आणि संघासाठी याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याच्यावर भर दिला.”

रोहित शर्मा अखेरीस म्हणाला, “चाहत्यांचे खूप खूप आभार, त्यांच्या या पाठिंब्यासाठी आणि संघाला पाठिंबा दिल्याबद्दल खरंच आभार… जेव्हा चाहते संघाला पाठिंबा देतात तेव्हा खूप मोठा फरक पडतो.” यासह रोहित शर्माने पत्रकार परिषदेत हे देखील सांगितले की तो चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये.

Story img Loader