Rohit Sharma Statement on Siraj-Head Fight: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा १० विकेट्सने पराभव झाला, परंतु या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि मोहम्मद सिराज यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधलं. सिराज आणि हेड यांच्यात कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानातच वाद झाला होता. यानंतर दोन्ही खेळाडूंनी मैदानात काय झालं ते सांगितलं पण आता यावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने वक्तव्य केले आहे.
गुलाबी चेंडू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सिराजने उत्कृष्ट यॉर्कर टाकत हेडला क्लीन बोल्ड केले. हेड १४० धावांवर खेळत होता आणि भारतासाठी त्याच्या धावा करणं मोठं डोकेदुखी ठरलं होतं. सिराजने हेडला बाद केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर हेड म्हणाला की, मी सिराजचे कौतुक केले होते, पण त्याने वेगळा अर्थ घेतला. मात्र सिराजने रविवारी वक्तव्य करत हेडचं म्हणणं खोटं असल्याचं सांगितलं.
भारताच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माला सिराज आणि हेडच्या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कर्णधार म्हणाला, “मी स्लिपमध्ये उभा होतो. काय झालं ते मला माहित नाही. पण जेव्हा दोन अतिशय प्रतिस्पर्धी संघ खेळत असतात तेव्हा अशा गोष्टी घडतात. हेड चांगली फलंदाजी करत होता आणि आम्ही त्याला बाद करण्याचा विचार करत होतो. दुसरीकडे, हेडला फटकेबाजी करत गोलंदाजांवर दबाव आणायचा होता. जेव्हा आम्हाला विकेट मिळाली तेव्हा त्याने सेलिब्रेशन केले.
रोहित म्हणाला, “साहजिकच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असेल. काय बोलणं झालं ते मला कळलं नाही कारण माझं काम एका गोष्टीकडे लक्ष देणं नाही. मी संपूर्ण सामन्यावर लक्ष ठेवून होतो, पण या प्रकरणाला फारसे महत्त्व दिले जाऊ नये. जेव्हा भारतीय आणि ऑस्ट्रेलियासरखे संघ खेळतात तेव्हा अशा गोष्टी घडतात. हा खेळाचा भाग आहे”
हेडबरोबर झालेल्या वादानंतर मैदानावर उपस्थित ऑस्ट्रेलियन चाहत्यांना सिराजची हुर्याे उडवली. यावर रोहित म्हणाला की, अशा गोष्टींचा सिराजवर काहीही परिणाम होत नाही. तो म्हणाला, “सिराज आक्रमक पवित्र्याने खेळणारा खेळाडू आहे. या मानसिकतेचा त्याला विकेट पटकावताना फायदा होतो. कर्णधार म्हणून त्याला पाठिंबा देणं हे माझं काम आहे पण आक्रमकता आणि अतिआक्रमकता यातला फरक खेळाडूंनी ओळखायला हवा. कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते, ती ओलांडता कामा नये.”
रोहित पुढे म्हणाला, “असं आधीही घडलं आहे. सिराजला आक्रमकता आवडते. पण मी पुन्हा सांगेन. आक्रमक असणं आणि अधिक आक्रमक होणं, यात एका सीमारेषेचा फरक आहे. एक कर्णधार म्हणून त्याने ही सीमारेषा ओलांडू नये यासाठी मी प्रयत्न करतो.”