Rohit Sharma Press Conference IND vs AUS 2nd Test: भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता हा सामना खेळवला जाईल. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटीच्या एक दिवस आधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलियन संघात फुट पडल्याच्या अफवांवर वक्तव्य केले.
पर्थ कसोटी सामन्यात भारताने कांगारू संघाचा दारुण पराभव केला आणि यानंतर संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेडलवूडने यासाठी संघाच्या फलंदाजांना जबाबदार धरले. त्याच्या एका दिवसानंतर तो दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला. यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी दावा केला की, हेजलवूडला दुखापत झाली नाही, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पराभवासाठी फलंदाजांना दोष दिल्याने शिक्षा झाली असावी, असे ते म्हणाला होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये फूट पडल्याचा अंदाज बांधला जात होता.
ऑस्ट्रेलिया संघात फुट पडल्याबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?
पत्रकार परिषदेदरम्यान, कांगारू संघातील मतभेदाच्या मुद्द्यावर रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले की, त्याला ऑस्ट्रेलियन संघातील कोणत्याही प्रकारच्या मतभेदाबाबत काहीच माहिती नाही. तो म्हणाला की, “त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये काय चाललं आहे याबद्दल मला काहीही माहिती नाही. मला आमच्या ड्रेसिंग रूमबद्दल माहिती आहे, जिथे चांगलं वातावरण आहे.”
पर्थ कसोटीतील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, भारतीय संघाच्या मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या विजयाने तो खूश आहे आणि ज्याप्रमाणे मालिकेला सुरूवात केली ते पाहता संघ विजयी होईल अशी आशा आहे.
रोहितने दावा केला की त्यांचा संघ मानसिकदृष्ट्या इतका मजबूत आहे की ते कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. रोहित म्हणाला की, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला कोणत्याही स्थितीत खेळावेच लागते. खेळाडू मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि परिस्थितीशी जुळवून घेणं ही समस्या नाही. ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात. हे अवघड आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काहीही सोपे नसते.