Rohit Sharma Gives Update on Rishabh Pant Injury: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला एकामागून एक धक्के बसत होते. या सामन्यात पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव ४६ धावांवर आटोपला. पहिल्या डावात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद १८० धावा केल्या होत्या. सामन्यानंतर रोहित शर्माने ऋषभ पंतच्या दुखापतीवर मोठे अपडेट दिले आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या बेंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळताना ऋषभ पंतला दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला इतक्या वेदना होत होत्या की त्याला लगेच मैदान सोडावे लागले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो मैदानात कधी परतणार याविषयी मोठे अपडेट दिले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…

ऋषभ पंतच्या पायाला दुखापत कशी झाली?

ऋषभ पंतला दुखापत झाल्याची घटना शेवटच्या सत्रात घडली जेव्हा रवींद्र जडेजाने डेव्हॉन कॉनवेला चेंडू टाकला, कॉन्वेन फटका खेळायला गेला पण तो चुकला आणि विकेटच्या मागे उभ्या असलेल्या पंतच्या गुडघ्यावर जाऊन हा चेंडू आदळला. चेंडू थेट त्याच्या उजव्या गुडघ्याला लागला, त्यानंतर तो वेदनेने ओरडला. पंत वेदनेने ओरडत जमिनीवर पडला. फिजिओने धावत मैदानात जाऊन त्याची तपासणी केली, मात्र काही वेळ वाट पाहिल्यानंतर पंतला मैदान सोडावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने दिवसाच्या उर्वरित खेळात विकेटकिपिंग केली.

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, “दुर्दैवाने त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. चेंडू थेट त्याच्या गुडघ्याला लागला, ज्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तिथे थोडी सूज आली आहे. यावेळी स्नायू थोडे मऊ झालेले असतात. आम्हाला धोका पत्करायचा नाही आणि खबरदारी म्हणून त्याला मैदानाबाहेर पाठवले. तो लवकरच या दुखापतीतून बरा होईल, अशी अपेक्षा आहे.”