Rohit Sharma on Rishabh Pant Shot Selection and Wicket: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या रोमांचक सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाने १८४ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी ३४० धावांची गरज होती. भारताने दोन सत्र चांगली फलंदाजी करत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. पण तिसऱ्या सत्रात ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारताची उर्वरित फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेलबर्नमधील या पराभवानंतर पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माला अनेक प्रश्न विचारण्यात आले. कर्णधार आपल्या संघातील खेळाडूंचा बचाव करताना दिसला, ऋषभ पंतच्या फटकेबाजीबाबत विचारताचा त्याने पंतला पाठिंबा तर दर्शवलाच पण त्याला नकळत सल्लाही दिला.

हेही वाचा – IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

भारताची ३ बाद ३३ अशी अवस्था असताना खराब सुरुवातीनंतर ऋषभ पंत (१०४ चेंडूत ३० धावा) आणि सलामीवीर यशवी जैस्वाल यांनी चौथ्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या. दुसरे सत्र एकही विकेटशिवाय गेले आणि भारताला बरोबरी साधता येईल असे वाटत होते. पण पंतने फिरकीपटू ट्रॅव्हिस हेडच्या गोलंदाजीवर लाँग-ऑनच्या दिशेन एक आक्रमकपणे चेंडू खेळला आणि ऋषभ पंत बाद झाला, इथूनच भारताच्या एकामागून एक विकेट गमावल्या आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला पराभवानंतर धक्का, अंतिम फेरी गाठण्याकरता भारतासाठी कसं असणार समीकरण?

ऋषभ पंत ज्या शॉटवर खेळून झेलबाद झाला त्याबाबत आज काही चर्चा झाली का असं रोहित शर्माला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं, यावर उत्तर देताना कर्णधार म्हणाला, “आज याबाबत काहीच चर्चा झाली नाही. आम्ही सर्वच पराभवामुळे निराश आहोत. पंतला इतर कोणी सांगण्यापेक्षा स्वत:ला कळलं हवं त्याच्याकडून संघाला काय अपेक्षा आहेत. त्याचं त्याला कळलं पाहिजे.”

हेही वाचा – “विराट खेळत राहील पण रोहित…”, रवी शास्त्रींचं विराट-रोहितच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य, कर्णधाराबद्दल स्पष्टच बोलताना म्हणाले…

पुढे रोहित म्हणाला, “एक कर्णधार म्हणून, तुम्हाला माहिती आहे की अशी फटकेबाजी करून त्याला यापूर्वी यश मिळालं आहे आणि त्यावरच त्याच्याशी चर्चा करणं किती कठिण आहे. पण याबाबत आता त्याला ठऱवायचं आहे की कोणत्या परिस्थितीत काय करायचं आहे. परिस्थिती काय आहे हेही महत्त्वाचं आहे.”

ऋषभबद्दल रोहित पुढे म्हणाला, “सामन्यात काही वेळ अशी असते की जिथे जोखीम पत्करून खेळावं लागतं, मग तुम्ही ती जोखीम पत्करणार का की प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी देणार. हे सर्व त्याला स्वत: समजून घेण्याची गरज आहे. मी ऋषभ पंतला खूप पूर्वीपासून ओळखतो आणि त्याची क्रिकेट खेळण्याची पद्धतही मला माहित आहे. आम्ही आधीही यावर चर्चा केली आहे. त्याच्या शॉट सिलेक्शनबाबत मी त्याच्याशी बोललो नाही असं नाही किंवा संघाला त्या घडीला काय आवश्यक आहे हे त्याला कळत नाही असंही नाहीय. त्याला हे सर्व माहितीय. पण अशाप्रकारे खेळून त्याला त्याचा चांगला परिणामही दिसला आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma statement on rishabh pant poor shot selection and wicket said he needs to understand what is required from himself bdg