Rohit Sharma Statement on T20 World Cup Final: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांतीवर आहे. बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकल्यानंतर रोहित शर्मा अबुधाबीमध्ये सुट्टी घालवत आहे. टीम इंडिया ६ ऑक्टोबरपासून बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोचा एक एपिसोड समोर आला आहे ज्यामध्ये रोहित शर्मासह टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितने टी-२० वर्ल्डकप अंतिम सामन्यात ३० चेंडूत ३० धावांची गरज असताना काय मैदानावर सुरू होतं, याबद्दल खुलासा केला आहे. क्लासेन बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी काही शाब्दिक डावपेच वापरण्याचा निर्णय घेतला. शोमध्ये रोहितबरोबर त्याचे सहकारी सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह देखील सामील झाले होते.

हेही वाचा – IND-W vs PAK-W Live score : आशा शोभनाने भारताला मिळवून दिली सर्वात मोठी विकेट, रिचा घोषने टिपला फातिमाचा अप्रतिम झे

रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि त्यांच्या फलंदाजांना काही ना काही बोलत होतो. (स्लेज करत होते). आता आम्ही सर्वजण मैदानावर त्यांना काय बोललो ते आता मी इथे सांगू शकत नाही. पण त्यावेळेला ही गोष्ट करणं गरजेचं होतं. कारण, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत तो सामना जिंकायचा होता.”

रोहितने खेळाडूंना इतकंही सांगितलं की, त्या खेळाडूंना आपण सुनावताना, स्लेज करताना आपला दंड वगैरे बसला तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला जे हवं ते त्यांना बोला. अंपायर्स आणि रेफ्रीला आपण नंतर बघून घेऊ. रोहितच्या या वाक्यानंतर समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा – IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली कोणाकोणाला मिळणार संधी? जाणून घ्या भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकणे हा एक ऐतिहासिक क्षण होता, कारण भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप पुन्हा पटकावला होता. हार्दिक पंड्याने १७व्या षटकाच्या सुरुवातीलाच हेनरिक क्लासेनची महत्त्वाची विकेट मिळवत खेळ बदलला.

भारताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना हेनरिक क्लासेन २७ चेंडूत ५२ धावा करत आणि नंतर डेव्हिड मिलरसह भागीदारी रचत भारतावर दबाव आणला. दक्षिण आफ्रिकेच्या सहा विकेट्स बाकी असताना, पांड्याने क्लासेनला बाद करण्यापूर्वी सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. पण क्लासेनच्या या विकेटने सामन्याचा रोख बदलला आणि भारताने पुनरागमन केले. हार्दिकने मिलरची विकेट घेत सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने आणला. भारताच्या विजयानंतर रोहित आणि विराट कोहली या दोघांनीही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma statement on t20 world cup final he allows teammates to sledge south africa batters said umpire aur referees ko baad mein dekh lenge video bdg