Rohit Sharma on T20I Retirement: भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरूद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी कर्णधार रोहित शर्माकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले होते. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या टी-२० फॉरमॅटला अलविदा केला.
जिओसिनेमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रोहित शर्माला विचारण्यात आले की, ‘आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर तू निवृत्त होशील याची चाहत्यांना भीती वाटते. यावेळीही असं काही होईल का?’, रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले.
हेही वाचा – Rohit Sharma: “मजा घेऊ द्या त्यांनाही…”, रोहित शर्माने इंग्लंडचं उदाहरण देत बांगलादेशला दिला इशारा
रोहित म्हणाला, ‘आजच्या काळात लोकांनी निवृत्तीची चेष्टा मांडली आहे. खेळाडू निवृत्ती घेतात आणि पुन्हा खेळू लागतात. भारतात असं अजून झालेलं नाही. निवृत्तीनंतर खेळाडू परत येऊन खेळतात, असं इथे क्वचितच पाहायला मिळालं आहे. पण मी इतर देशांच्या खेळाडूंना पाहतो. हे खेळाडू निवृत्तीची घोषणा करतात. पण नंतर खेळायला परत मैदानात उतरतात. त्यामुळे तो खेळाडू निवृत्त झाला आहे की नाही हे तुम्हाला समजत नाही.”
रोहित स्वत:बद्दल म्हणाला, ‘माझं तसं नाहीय. टी-२० मधून निवृत्ती घेण्याचा माझा अंतिम निर्णय आहे. टी-२० क्रिकेटला अलविदा करण्याची तीच योग्य वेळ होती म्हणून मी तसं केलं. मी भारतासाठी या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली. मी माझा पहिला सामना एकदिवसीय सामन्यामध्ये खेळलो, पण नंतर थेट टी-२० विश्वचषक खेळायला गेलो. तेव्हा आम्ही तो विश्वचषक पटकावला होता. आता मी आणखी एक टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.”
हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: ना सोनी, ना स्टार, या चॅनेलवर पाहता येईल भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण
रोहित शर्माची टी-२० कारकीर्द
रोहित शर्माने जवळपास १७ वर्षे टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेट सामने खेळले आहेत. या काळात तो दोनदा टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने २००७ मध्ये संघातील खेळाडू म्हणून पहिली ट्रॉफी आणि २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्माने टीम इंडियासाठी एकूण १५९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५ शतकांच्या मदतीने ४२३१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३२ अर्धशतकेही केली आहेत.