Rohit Sharma Press Conference Ahead of 3rd Test: भारतीय संघ गुरुवार २६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळणार आहे. रवीचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयानंतर तो मायदेशी परतला आहे. आता टीम इंडियामध्ये मुंबई क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियन याला संघात सामील केलं आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादवसारखे उथ्कृष्ट फिरकीपटूंचे पर्याय असतानाही संघाने तनुषला संधी का दिली, हे रोहित शर्माने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याबरोबरच रोहित शर्मानेही त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिले.
अश्विनच्या जागी तनुषची निवड का करण्यात आली, असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला. रोहितने सांगितले की, “हो तनुष महिन्याभरापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये होता. कुलदीप, माझ्यामते त्याच्याकडे व्हिसा नाही आहे. आम्हाला असं कोणीतरी हवं होतं की जो लगेच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल आणि पोहोचेल, तनुष यासाठी तयारीत होता. मस्करी करतोय. तनुष ऑस्ट्रेलियामध्ये खेळला आहे. त्याने गेल्या १-२ वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी आपण पाहिली आहे. जर मेलबर्न किंवा सिडनी कसोटीमध्ये दोन फिरकीपटूंची गरज भासली तर आम्हाला बॅकअप म्हणून खेळाडू हवा होता.”
कुलदीप यादवकडे व्हिसा नाही असं रोहित शर्मा पत्रकार परिषदेदरम्यान गंमतीत म्हणाला. पण कुलदीप यादववर शस्त्रक्रिया झाल्याचे रोहित शर्माने सांगितले तर अक्षर पटेल नुकताच बाबा झाल्यामुळे त्याने वैयक्तिक कारण देत उपलब्ध नसल्याचे सांगितले.
यानंतर रोहित म्हणाला, “कुलदीप १०० टक्के फिट नाहीय. त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. अक्षर पटेल नुकताच बाबा झाला आहे त्यामुळे तो संघाबरोबर प्रवास करू शकत नाही. म्हणूनच आम्ही तनुषला संधी दिली जो आमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय होता. मुंबईच्या रणजी विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या सामन्यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. संघासाठी तो एक उत्तम पर्याय आहे.”
हेही वाचा – IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
भारतीय कर्णधाराने त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला सरावाच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यानंतर तो वेदनेमध्ये दिसला. रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याची गुडघ्याची दुखापत पूर्णपणे बरी असून तो मेलबर्न कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.