Rohit Sharma Statement on Test Retirement: सिडनी कसोटीत रोहित शर्माने त्याचा खराब फॉर्म पाहून खेळण्याचा निर्णय घेतला होता. रोहित सिडनी कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे तो कधीही कसोटीतून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा सुरू होती. रोहितला प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने संघातून वगळल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र कर्णधार रोहित शर्माने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. याशिवाय कसोटीत पुनरागमन करण्याबाबत रोहितने मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्माने आपण सध्या कसोटीतून निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय तो कसोटीत पुनरागमन करेल अशी त्याला पूर्ण आशा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला आता जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर या मालिकेपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. टीम इंडिया यासाठी पात्र ठरेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्माने ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, ” हा काही निवृत्तीचा निर्णय नाही. मी फक्त फॉर्मात नसल्यामुळे खेळत नाही. गोष्टी रोज बदलत असतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की गोष्टी बदलतील.”
हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराह चालू सामन्यातच सिडनी स्टेडियमबाहेर, टीम डॉक्टरसह का सोडलं मैदान?
पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मला माझ्याशी प्रामाणिक राहण्याबरोबरच जे वास्तव आहे तेही पाहावं लागणार आहे. मी समजूतदार आहे, सूज्ञ आहे आणि २ मुलांचा बाप आहे. त्यामुळे कधी काय करायचं हे मला माहित आहे. संघासाठी काय योग्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे, जर तुम्ही संघाचा विचार केला नाही तर अशा प्रकारचे खेळाडू नको आहेत. आपण जर संघ म्हणतो तर संघाला काय गरजेचं आहे याचा नेहमी विचार केला पाहिजे. ही माझी वैयक्तिक विचारसरणी आहे आणि मी याचपद्धतीने क्रिकेट खेळत आलो आहे आणि मी क्रिकेटच्या बाहेरही असाच आहे. एक व्यक्ती म्हणून मी खूप पारदर्शक आहे.”
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने मोडला ४७ वर्षे जुना विक्रम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला नवा विक्रम
बाहेरचा कोणीही व्यक्ती मी खेळातून कधी पायउतार व्हावे हे सांगू शकत नाही, याबाबत कर्णधार म्हणाला, “एखादी व्यक्ती माईक, लॅपटॉप किंवा पेनने काय लिहित आहेत किंवा काय बोलत आहेत हे महत्त्वाचे नाही. आम्ही इतकी वर्षे खेळत आहोत त्यामुळे आम्ही केव्हा खेळायचं किंवा केव्हा खेळायचं नाही किंवा कधी बाहेर बसायचं किंवा कधी संघाचं नेतृत्त्व करायचे हे ते ठरवू शकत नाहीत.”
जसप्रीत बुमराहबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “ज्याप्रमाणे बुमराहने कामगिरी केली आहे ते पाहता त्याने एक दर्जा तयार केला आहे. २०१३ मध्ये जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या कामगिरीचा आलेख खरोखरच उंचावला आहे आणि तो सातत्याने वाढत आहे. क्रिकेटचा हा फॉरमॅट तुम्हाला आयतं काही देत नाही, तुम्हाला ते कमवावं लागतं.”