Rohit Sharma on Mindset and Trollers BCCI Video: रोहित शर्माने कटकमध्ये झालेल्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावून टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला अखेरीस सूर गवसला आणि हिटमॅन स्टाईल फटकेबाजी केली. भारतीय कर्णधाराने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ९० चेंडूत ११९ धावांची खेळी खेळली होती. या खेळीत त्याने ७ षटकार आणि १२ चौकार लगावले. रोहितचा स्ट्राईक रेट या खेळीदरम्यान १३२ पेक्षा जास्त होता आणि त्याच्या शतकामुळे भारताने ४५ व्या षटकात ३०५ धावांचे लक्ष्य गाठले. या खेळीनंतर रोहित बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत खूप भावूक झाला.
रोहित शर्माने शतकी खेळीनंतर दिलेल्या मुलाखतीत तो भावुक झाला होता. रोहितचा हा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. ज्यात रोहित शर्माने त्याला ट्रोल करणाऱ्यांसाठी आणि चाहत्यांसाठी मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मा शतक झळकावल्यानंतर बीसीसीआयने घेतलेल्या मुलाखतीत बोलण्यापूर्वी थोडावेळ थांबला आणि त्यानंतर रोहित म्हणाला, “मी हेच सांगत आलो आहे. बघा, जर एखाद्या खेळाडूने दीर्घकाळ क्रिकेट खेळले असेल आणि त्याने वर्षानुवर्षे धावा केल्या असतील, तर ही काही साधी गोष्ट नाहीय. मी खूप काळापासून क्रिकेट खेळत आहे. मला माहित आहे की मला काय करायचं आहे आणि मी आज तेचं केलं.”
पुढे रोहित म्हणाला, “माझ्या डोक्यात फक्त मी ज्या पद्धतीने इतकी वर्ष खेळत आलो आहे, तसंच खेळायचं हे होतं. मी जशी फलंदाजी करत आलो आहे तशी फलंदाजी करण्याचं डोक्यात सुरू होतं. मी सांगितल्याप्रमाणे गेली अनेक वर्ष मी खेळत आहे त्यामुळे एखाद दुसऱ्या डावात मी अपयशी झाल्याने माझं मत माझी खेळण्याची पद्धत माझं मत बदलू शकत नाहीत. हा दिवस इतर दिवसांसारखाच होता.”
रोहित पुढे म्हणाला, “आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायची असते आणि ती म्हणजे मैदानावर जाऊन खेळणं. दिवसाच्या अखेरीस जेव्हा आपण झोपायला जातो आणि तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण आपली कामगिरी चोख बजावली आहे आणि हेच महत्त्वाचं असतं. जेव्हाही मी मैदानावर खेळण्यासाठी उतरतो, तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी आपल्या मनासारखं घडतं, कधी कधी नाही… जोपर्यंत मला स्पष्टता आहे की मला काय करायचं आहे, हेच सर्वात महत्त्वाचं आहे.”
अखेरीस रोहित म्हणाला, “जेव्हा तुम्ही इतक्या धावा केल्या, म्हणजे तुम्ही काहीतरी साध्य केलं आहे, बरोबर? फक्त धावा कशा करायच्या या मानसिकतेकडे परत जाणं आवश्यक आहे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते खूप कठीण आहे. पण माझ्या डोक्यात त्या क्षणाचा खेळण्याचा आनंद घेणं हे असतं. खेळ यासाठीच खेळतो. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा खेळाचा आनंद घेण्यासाठी…,” रोहित म्हणाला.