व्यंकट कृष्णा बी, इंडियन एक्सप्रेस
Rohit Sharma Test Career: रोहित शर्माने सिडनी कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेत नेतृत्त्वाचे एक उत्तम उदाहरण मांडले आहे, असे बुमराहने नाणेफेकीच्या वेळेस सांगत सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. रोहितच्या या निर्णयाने चाहते नक्कीच चकित झाले होते. काही वेळाने सामना सुरू होताच रोहित शर्मा ड्रेसिंग रूमबाहेर बसलेला दिसला. रोहित शर्माच्या या निर्णयानंतर कदाचित त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळल्याची चर्चा होती, पण आता या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारताच्या कसोटी क्रिकेटमधील योजनांचा भाग नसणार आहे आणि याची माहिती त्याला सिडनी कसोटीपूर्वीच देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघाची निवड समिती विराट कोहलीबरोबर देखील चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारताचा कसोटी संघ एक मोठ्या संक्रमणातून जाणार आहे. याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंपैकी एक म्हणजे रवींद्र जडेजा मात्र त्याची अष्टपैलू कामगिरी पाहता भारताच्या कसोटी क्रिकेटच्या योजनांचा भाग असणार आहे.
रोहित शर्मा सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय हा खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याचे दिसते. रोहित शर्मा या मालिकेदरम्यान फॉर्मशी झगडताना त्याने ५ डावांमध्ये ३,६,१०,३ आणि ९ धावांची खेळी केली. रोहितच्या या फॉर्मचा परिणाम त्याच्या नेतृत्त्वावरही दिसून आला.
रोहित शर्मा भारताच्या कसोटी योजनांचा भाग नसल्याचे जरी बीसीसीआयने सांगितले आहे, पण भारताने WTC फायनलमध्ये प्रवेश केला तर रोहित संघात पुनरागमन करू शकेल का हा मोठा प्रश्न आहे. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भात, येत्या काही दिवसांत संघ भारतात परतल्यावर चर्चा होणार आहे. यानंतर सिडनी कसोटीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावर सर्वांच्या नजरा आहेत. सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ १८५ धावा करत सर्वबाद झाला. तर ऑस्ट्रेलिया सध्या १ बाद ९ धावांवर खेळत आहे.