Rohit Sharma has decided to rest during IND vs AUS Sydney Test : भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने सिडनी येथील पाचव्या कसोटी सामन्यात विश्रांती घेतली आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची आणि भारतीय संघाची खराब कामगिरी मानली जात आहे, ज्यामध्ये मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते, ज्यामुळे भारताला मालिका बरोबरीत राखता आली नाही. या दौऱ्यात रोहित शर्माची फलंदाजी खूपच खराब राहिली आहे.
कसोटी कर्णधारपद स्वीकारल्यापासून रोहित चार सामन्यांना मुकलाय –
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर, टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी सांभाळण्यासाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली, त्यानंतर २०२४ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमधील भारतीय संघाच्या विजयानंतर त्याने या फॉरमॅटमदधून निवृत्ती घेतली. वनडे आणि कसोटीमध्ये तो अजूनही ही जबाबदारी पार पाडत आहे. रोहितने मार्च २०२२ मध्ये प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व केले, तेव्हापासून तो फक्त ४ सामन्यांना मुकला आहे, ज्यापैकी केएल राहुलने दोन सामन्यांमध्ये ही जबाबदारी पार पाडली आणि जसप्रीत बुमराहने दोन सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.
टीम इंडियाने या चारपैकी जिंकले तीन सामने –
कसोटीमध्ये, २०२२ मध्ये, रोहित शर्मा पहिल्यांदा कर्णधार म्हणून जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मुकला, ज्यामध्ये बुमराहने संघाचे नेतृत्व केले. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्याच वर्षाच्या अखेरीस, टीम इंडियाने बांगलादेशचा दौरा केला ज्यामध्ये रोहितच्या अनुपस्थितीत, केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, एक सामना १८८ धावांनी जिंकला आणि दुसरा सामना ३ विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही, ज्यामध्ये बुमराहने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि टीम इंडियाने हा सामना २९५ धावांनी जिंकला.
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपली?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यादरम्यान देशभरातील चाहत्यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले. मात्र, विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत हेच चाहते त्याला भारतीय कसोटी संघातून काढून टाकण्याची मागणी करत आहेत.कारण रोहित शर्माने कर्णधार आणि फलंदाज म्हणून अत्यंत खराब कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये त्याने ५ डावात फक्त ३१ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचा अंत अगदी जवळ आल्याचे दिसते.