रोहित शर्माच्या फॉर्मसह त्याच्या नेतृत्त्वावरही बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर प्रश्नचचिन्ह उभारले जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने घऱच्या मैदानावरील न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावली तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताला ३-१ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेईल अशी चर्चा होती. पण रोहितने पाचव्या कसोटीदरम्यान या चर्चा फेटाळून लावल्या. यादरम्यान आता रोहित शर्मा भारतीय संघाकडून अखेरचा सामना कधी खेळणार, यासंबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे.
रोहित शर्माबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार भारताचा हिटमॅन चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही, म्हणजेच या स्पर्धेनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात येईल. ११ जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माही होता, ज्यामध्ये टीमला दुसरा कर्णधार मिळेपर्यंत रोहित कर्णधारपदावर राहील अशी बातमी समोर आली होती, परंतु एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार रोहितसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार, रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येणार आहे. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीन गट सामने खेळायचे आहेत. शेवटचा गट सामना २ मार्च रोजी होणार आहे. जर संघ उपांत्य फेरीत पोहोचला नाही तर २ मार्च हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो आणि जर संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर तर ४ मार्च हा रोहित शर्माचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. जर संघ अंतिम फेरीत पोहोचला तर ९ मार्च हा रोहितच्या कारकिर्दीचा शेवटचा दिवस ठरू शकतो.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पूर्णपणे फ्लॉप ठरला. सिडनी कसोटीत त्याने न खेळता विश्रांती घेण्याचा निर्णय घेत तो प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर पडला. त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर जाणं कठिण असल्याचं म्हटलं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाला २०२७ मध्ये विश्वचषक खेळायचा आहे आणि रोहित आता ३८ वर्षांचा आहे, त्यामुळे वयाच्या ४०व्या वर्षी वर्ल्ड कप खेळणं त्याच्यासाठी कठीण आहे, म्हणूनच चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल, असे मानले जात आहे.