विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघामध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनंही प्रशिक्षकपदावर कायम राहण्याबाबत निर्णय घेतला नसल्याचे सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय व टी २० कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्माची लवकरच BCCI बरोबर महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबत होणार चर्चा?
रोहित शर्माशी बीसीसीआयचे पदाधिकारी मर्यादित षटकांच्या, अर्थात एकदिवसीय व टी-२० संघाच्या भवितव्याविषयी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चेमध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबतही बोलणी होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचं वय आत्ता ३६ असून पुढील विश्वचषकापर्यंत रोहित शर्माचं वय जवळपास ४० वर्षे असेल. त्यामुळे तोपर्यंत रोहित शर्मा कर्णधारपदावर राहणार का? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. रोहित शर्मासाठी तोपर्यंत पदावर राहणं शक्य नसल्यास नवीन खेळाडूला कर्णधारपदासाठी तयार करण्याची जबाबदारी रोहित शर्मावर टाकली जाण्याची शक्यता आहे.
टी-२० कर्णधारपदासाठी रोहित शर्मा अनुत्सुक?
दरम्यान, क्रिकट्रॅकरनं टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मानं विश्वचषक स्पर्धेच्या आधीच बीसीसीआयला टी-२० खेळण्यासंदर्भात कळवलं आहे. पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला विचार नाही झाला तरी हरकत नसल्याचं रोहितनं सांगितल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ४ वर्षांनी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीही नव्या कर्णधाराच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रीत
दरम्यान, २०२५ साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तोपर्यंत चालणाऱ्या कसोटी सामने व मालिकांवर रोहित शर्मा आता अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे एकदिवसीय व टी २० संघासाठी वेगळ्या कर्णधाराचा शोध बीसीसीआयकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून पुढच्या टी २० स्पर्धेच्या दृष्टीने संघात तरुण खेळाडूंना संधी देण्याचं धोरण निवड समितीनं अंगीकारल्याचं सांगितलं जात आहे.
कुणाकडे जाईल कर्णधारपदाची धुरा?
रोहित शर्मानंतर कर्णधारपदासाठी काही नावं चर्चेत आहेत. त्यात हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर ही नावं आघाडीवर आहेत. निवड समितीचा भर तरुण खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्यावर असल्यामुळे अजिंक्य रहाणेची वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. शिवाय हार्दिक पंड्या सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्यामुळे त्याच्याही नावावर फुली मारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे के. एल. राहुल किंवा श्रेयस अय्यरच्या नावाचा प्रामुख्याने विचार केला जाऊ शकतो.