IND vs AUS Champions Trophy Highlights in Marathi: भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाने स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी या सामन्यात योगदान देत संघाचा विजय सोपा केला. पण सध्या कुलदीप यादवचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित आणि विराट दोघेही त्याला शिव्या घालताना ओरडताना दिसत आहेत.
कुलदीप यादवला उपांत्य फेरीच्या या सामन्यात विकेट मिळाली नसली तरी त्याने आपल्या चांगल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला धावा करण्याची संधी दिली नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान विराट आणि रोहित कुलदीपवर इतके का संतापले होते, जाणून घेऊया.
कुलदीप यादव सामन्यातील ३१वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. जेव्हा स्टीव्ह स्मिथने कुलदीपचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. तेव्हा सीमारेषेवरून पुढे येच कोहलीने चेंडू उचलला आणि कुलदीपच्या दिशेने लगेच परत फेकला.
यावेळी स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी यांनी एक धाव पूर्ण केली होती. मात्र चेंडू त्याच्या दिशेने येताच तो पकडण्याऐवजी कुलदीपने हात मागे घेत चेंडू सोडला. चेंडू त्याला पास करून दुसऱ्या बाजूला गेला. मोठी गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित मागे उभा होता, ज्याने चेंडू रोखला. मात्र विराट आणि रोहितला कुलदीपची ही कृती अजिबात आवडली नाही आणि दोघांनीही त्याला या चुकीबद्दल फटकारले आणि अपशब्दही वापरले.
कुलदीप यादवच्या खात्यात एकही विकेट मिळाली नाही. कुलदीप यादव हा भारताचा एक महत्त्वाचा फिरकीपटू आहे. त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला मधल्या षटकांमध्ये अनेक विकेट मिळवून दिल्या आहेत. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुलदीपच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली नाही. कुलदीपने आतापर्यंत टूर्नामेंटमधील ४ सामन्यांत ३६.६० च्या सरासरीने केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत. याउलट केवळ २ सामने खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
God bless Kuldeep Yadav ?#INDvsAUSpic.twitter.com/aSmbPHgQPO
— Sunil the Cricketer (@1sInto2s) March 4, 2025
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २६४ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४९व्या षटकात ४ विकेट्स गमावून सामना जिंकला आणि विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट बुक केले. वरुण चक्रवर्ती, शमी आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासाठी गोलंदाजीत छाप सोडली. तर फलंदाजीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनी चांगली खेळी केली.