Rohit Sharma Virat Kohli Video: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद आपल्या नावे केले आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करत भारताने गेल्या १० महिन्यांत दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीची बरीच चर्चा होती. भारतीय क्रिकेटच्या या दोन महान खेळाडूंच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही शेवटची स्पर्धा असेल, असे मानले जात होते. पण जेतेपदानंतर विराट आणि रोहितचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दोघे निवृत्तीबद्दल बोलताना दिसले.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावल्यानंतर कोहली-रोहितने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. टीम इंडिया चॅम्पियन बनल्यानंतर किंग कोहली आणि कॅप्टन रोहित यांच्यातील मैदानावरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारताने जेतेपद पटकावल्यानंतर रोहित आणि विराट मैदानात स्टंप्सने दांडिया खेळताना दिसले. दांडिया खेळून झाल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात हात घालत बोलतानाचा व्हीडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

रवींद्र जडेजाने लगावलेल्या विजयी चौकारासह टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. सर्व भारतीय खेळाडू मैदानात मोठा जल्लोष करताना दिसले. जडेजा, अर्शदीप आणि हर्षित राणा गंगनम स्टाइल डान्स करताना दिसले. तर कोहली आणि रोहित स्टंपसह दांडिया खेळताना दिसले. सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचे समाधान कोहली-रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

या सेलिब्रेशन दरम्यान, रोहित-कोहलीचा मैदानावरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधाराने त्याच्या आणि विराटच्या निवृत्तीबद्दलच्या सर्व अफवांवर एक हिटमॅन स्टाईल वक्तव्य केलं. व्हायरल व्हिडिओमध्ये सेलिब्रेशन दरम्यान रोहित कोहलीला म्हणाला, “भाई, आपण काही निवृत्त नाही आहोत. ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी…” रोहित हे बोलताना त्याच्या स्टाईमध्ये शिवीदेखील घालतो. रोहितचे शब्द ऐकताच विराट कोहलीही जोरजोरात हसू लागतो.

याशिवाय पत्रकार परिषदेत बोलतानाही रोहित शर्मा म्हणाला, मी काही वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये, यापुढे कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत म्हणून सांगतो. असं रोहित शर्मा म्हणाला. विराट आणि रोहित ४-४ आयसीसी ट्रॉफी जिंकणारे भारतीय खेळाडू ठरले आहेत. विराट आणि रोहितने या संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाला गरज असताना मोलाची भूमिका बजावली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. हिटमॅनने ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला. रोहितने शुबमन गिलसह पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. फायनलमध्ये विराट कोहली बॅटने काही खास कामगिरी करू शकला नाही आणि केवळ एक धाव काढून बाद झाला. श्रेयस अय्यरने चांगली फलंदाजी करत ६२ चेंडूत ४८ धावांची दमदार खेळी केली, तर केएल राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला.

Story img Loader