टीम इंडियाचं टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. नामिबिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही कार्यकाळ संपला आहे. २०१७ पासून रवी शास्त्री भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने यशस्वी वाटचाल केली. त्यांच्या यशस्वी वाटचालीचा प्रत्येक खेळाडूने स्तुती केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने रवी शास्त्री यांना खास गिफ्ट दिलं.
नामिबिया विरुद्धचा सामना झाल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये शेवटचं संभाषण करताना रवी शास्त्री भावुक झाले होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी आपली बॅट रवी शास्त्री यांना गिफ्ट दिली. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोत रवी शास्त्री यांच्या हातात दोन बॅट दिसत आहेत.
शास्त्री आयपीएलमध्ये दिसणार आहेत. आयपीएलचा १५वा हंगाम २०२२ मध्ये खेळवला जाणार आहे. नव्या हंगामात संघांची संख्याही आठ वरून दहा होईल. अहमदाबाद आणि लखनऊ या स्पर्धेत दोन नवीन फ्रेंचायझी जोडणार आहेत. CVC कॅपिटल्सने रवी शास्त्री यांची अहमदाबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. भरत अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक, तर आर श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. मात्र, याबाबत रवी शास्त्री आणि अहमदाबाद फ्रेंचायझीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.