Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah Rested for India vs Sri Lanka Series: भारताचा युवा क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होणार आहे. जुलैच्या अखेरीस श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका होणार आहे. तर एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार नाहीत.
हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि इतर दोन वरिष्ठ खेळाडूंनी अधिक विश्रांती घ्यावी अशी भारतीय क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. रोहित, विराट आणि बुमराह हे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करतील. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरूद्ध भारताला दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने भारतात खेळायचे आहेत.
२७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकत्याच झालेल्या विश्वचषकानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर बुमराहने सांगितले की तो देशासाठी यापुढेही खेळताना दिसणार आहे. पुढील आठवड्यात संघ निवडीसाठी निवड समितीची बैठक होणार आहे.
हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला पाहिलात का? कोट्यवधींच्या वास्तूत आहेत या गोष्टी
“वरिष्ठ खेळाडू थोडी विश्रांती घेऊ शकतात आणि पुढील संपूर्ण क्रिकेट हंगामासाठी सज्ज होतील. रोहित, विराट आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे आणि ते सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघात सामील होतील,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
बांगलादेशनंतर, भारतीय संघ १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध तीन कसोटी सामन्यांसाठी खेळणार आहे. या सामन्यांसाठी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चार टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी रवाना होईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.