IND vs NZ Umpire Gives Warning Rohit Sharma and Sarfaraz Khan: भारत वि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला असून किवी संघ २०० धावांच्या जवळ आहे. पण या सामन्यात मैदानावरील पंचांनी सर्फराझ खानला सक्त ताकीद दिली, तर रोहित शर्माला पंच ताकीद देताना दिसले. पण नेमकं काय घडलं, ते पाहूया.

हेही वाचा – INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला

मिचेलने तक्रार करताच दोन्ही भारतीय फलंदाजांना पंचांनी दिली सक्त ताकीद

सर्फराझ खान आणि कर्णधार रोहित शर्मा यांना वानखेडे स्टेडियमवर मैदानावरील पंचांकडून कडक इशारा देण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना भारतीय गोलंदाजीदरम्यान ३१वे षटक संपल्यानंतर घडली. जेव्हा पंच रिचर्ड इलिंगवर्थने रोहित शर्माला बोलावून घेतले. पंचांनी यादरम्यान सांगितले की, सर्फराझ खान सातत्याने काही ना काही बोलत होता, ज्यामुळे डॅरिल मिशेलचं लक्ष विचलित होत होतं. ज्याबद्दल किवी फलंदाजाने तक्रार केली. रोहित शर्मा या चर्चेदरम्यान सर्फराझची बाजूही घेताना दिसला. यानंतर रोहितने सर्फराझला समजावलं आणि मिचेलबरोबरही चर्चा केली.

हेही वाचा – IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

या वादाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, शॉर्ट लेग/सिली पॉईंटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला सर्फराझ खान फलंदाजी करताना मिचेलला काही ना काही बोलून सतत त्रास देत होता. त्यानंतर अखेर मिचेलने मैदानावरील पंचांकडे तक्रार केली. पण हे प्रकरण लगेच शांतही झालं.

सध्या डॅरिल मिचेलने त्याचे कसोटीमधील १२ वे अर्धशतक पूर्ण केले आहे. मुंबईतील वातावरणाचा आणि उन्हामुळे डॅरिल मिचेल चांगलाच हतबल झालेला दिसत होता. पाणी पित, एनर्जी सॅशे खात तो मैदानावर कायम राहिला आणि अखेरीस त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडचा निम्मा संघ वृत्त लिहेपर्यंत तंबूत गेला आहे. सध्या मैदानावर मिचेल आणि इश सोढीची जोडी आहे.