Rohit Sharma forced to make U turn on retirement after MCG Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. मालिकेच्या अखेरीस आणखी एक खेळाडू निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा होत्या, पण तसे झाले नाही. मात्र आता त्या खेळाडूचे नाव समोर आले आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून कर्णधार रोहित शर्मा होता. होय, मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला अलविदा करणार होता, पण त्याच्या एका हितचिंतकाच्या सांगण्यावरून त्याने आपला निर्णय बदलला आणि निवृत्ती घेतली नाही. हिटमॅनच्या निवृत्ती न घेण्याच्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहितने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्धार का केला होता?
दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही. ॲडलेड कसोटीत परतल्यावर तो मधल्या फळीत खेळला. कारण केएल राहुलने पर्थमध्ये डावाची सुरुवात करताना चांगली कामगिरी केली होती. ॲडलेड आणि गाबा या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित फ्लॉप ठरला. शेवटी, त्याने एक कठीण निर्णय घेतला आणि सलामीला उतरला. त्याच्या या निर्णयामुळे शुबमन गिलला बाहेर बसावे लागले आणि केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर उतरला. रोहितची ही युक्तीही कामी आली नाही आणि मेलबर्नमध्येही तो अपयशी ठरला. याच निराशेमुळे रोहित शर्माने निवृत्तीचा घेण्याचा निर्धार केला होता.
रोहितने का बदलला निर्णय?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रविचंद्रन अश्विननंतर निवृत्त होणारा भारतीय कर्णधार हा दुसरा खेळाडू असू शकला असता, परंतु त्याच्या जवळच्या काही लोकांच्या विनंतीवरून कर्णधाराने आपला निर्णय बदलला. या परिस्थितीची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, “रोहितने मेलबर्न कसोटीनंतर निवृत्ती घेण्याचे मन बनवले होते. जर बाहेरून त्याच्या हितचिंतकांनी त्याला त्याचे मत बदलण्यास भाग पाडले नसते, तर ऑस्ट्रेलियात आपण आणखी एका निवृत्ती घेताना पाहू शकलो असतो.”
अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये मतभेद –
रोहित शर्माचे निवृत्तीबद्दल मन बदलल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाराज झाले होते, अशी चर्चा होती. त्यानंतर रोहित सिडनी झालेलल्या कसोटीत खेळला नाही. खरं तर, संघ संयोजन, नाणेफेक आणि इतर अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये मतभेद होते. गंभीर आणि रोहित या दोघांवरही खराब प्रदर्शनानंतर चांगली कामगिरी करण्याचा दबाव आहे. दोघांनाही आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेबद्दल एकमत करण्याची गरज आहे. कारण ही स्पर्धा काही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची स्पर्धा असू शकते.