एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाबद्दल अजून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा रोहित शर्माला टी-२० टीमचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हा त्याला वनडे टीमचाही कॅप्टन व्हायचे होते. रोहित शर्माला फक्त एका मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा कर्णधार व्हायचे नव्हते. भारतीय क्रिकेटबाबत दिवसेंदिवस नव्या चर्चा ऐकायला मिळत असल्याने प्रत्येकजण विचारात पडला आहे.
विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने याआधीच टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. रोहित शर्मा आता टी-२० तसेच वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. रोहित शर्मावर आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
क्रिकबझ प्लसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा केवळ टी-२० फॉरमॅटमधील कर्णधारपदासाठी तयार नव्हता. ”टी-२० सोबत वनडेचे कर्णधार बनवले, तरच नेतृत्वाची भूमिका स्वीकारेन. त्यामुळे वनडेचा कप्तानपद मला मिळावे”, अशी मागणी रोहितने निवड समितीसमोर ठेवली होती.
हेही वाचा – ‘‘आमच्या खेळाडूंना अहंकार…”, टीम इंडियाची साथ सोडलेल्या प्रशिक्षकानं केले ड्रेसिंग रुममधील खुलासे!
वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत विराट कोहलीच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता, की टी-२० आणि वनडेचा कर्णधार वेगळा असू शकत नाही. त्यामुळे रोहित शर्माकडे संपूर्ण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटची जबाबदारी देण्यात आली आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, तो स्वतः विराट कोहलीशी याबद्दल बोलला होता.