Rohit Sharma Wicket IND vs ENG: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. टीम इंडियाने आज पहिल्या इंनिंगमध्ये फलंदाजी निवडून खेळाला सुरुवात केली. आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना न हरलेल्या व केवळ एकच सामना जिंकलेल्या इंग्लंडमधील हा सामना चुरशीचा होत आहे. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाची सुरुवात सुद्धा फारच वाईट झाली होती. ४० ला तीन बाद अशी स्थिती असताना सलामीवीर व कर्णधार रोहित शर्माने मात्र ३६व्या षटकापर्यंत गड राखून ठेवला होता. इंग्लंडला रोहित शर्माच्या विकेटची प्रतीक्षा असताना भारतीय कर्णधार मात्र जबरदस्त चौकार षटकार ठोकत होता. मात्र शतकाच्या अगदी जवळ असतानाच रोहितचा एक चुकीचा डाव आता इंग्लंडची प्रतीक्षा संपवून गेला.
३६ व्या षटकात १६४ धावांवर रोहित शर्माच्या विकेटच्या रूपात भारताला पाचवा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १०१ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या होत्या. मात्र आदिल रशीदच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेल दिला आणि तो बाद झाला. रोहितची विकेट घेण्यासाठी इंग्लंडला जेवढी प्रतीक्षा करावी लागली तितकीच मोठी रिस्क सुद्धा घ्यावी लागल्याचे दिसतेय. रोहितने चेंडूला टोलवताच लिव्हिंगस्टोनच्या दिशेने चेंडू सरळ रेषेत गेला असला तरी नेमका त्याच वेळी त्याचा गुडघा लॉक झाला. अशा स्थितीत लिव्हिंगस्टोन मैदानावर इतक्या जोरात आदळला की त्याच्या गुडघ्याने माती सुद्धा उकरलेली दिसत होती.
या थरारक विकेटनंतर लिव्हिंगस्टोनला फार गंभीर दुखापत झाली नसली तरी काही सेकंद मैदानावर सगळेच घाबरलेले दिसत होते. इंग्लंड विरुद्ध सामन्यात भारताच्या फलंदाजांची फळी इंग्लडसमोर पार गुडघे टेकताना दिसत आहे. गिलने या सामन्यात नऊ तर विराट कोहलीने भोपळाही न फोडता पॅव्हेलियनची वाट धरली होती. रोहित शर्माच्या ८७ धावांमुळे भारत पुढे जाताना दिसत होता मात्र त्याच्या विकेटनंतर भारतीय चाहत्यांची पूर्ण निराशा झाली आहे.