भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला तब्बल ११ वर्षांनंतर आयसीसी चषकावर आपले नाव कोरण्यात यश आले. २९ जून रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवून भारतीय संघ विश्वविजेता ठरला. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माबाबत मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्माने विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र यापुढे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी तोच कर्णधार असेल, असे जय शाह यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे जाहीर केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तिसऱ्या आयसीसी कसोटी विश्वचषकासाठी रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे त्यांनी सांगितले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण कसोटी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला.

आपल्या व्हिडीओ संदेशात जय शाह म्हणाले, “टीम इंडियाला ऐतिहासिक विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा विजय मी प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करत आहे. मागच्या वर्षभरातील आमचा हा तिसरा अंतिम सामना होता. जून २०२३ मध्ये आम्ही कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झालो. नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात सलग दहा सामने जिंकून आम्ही चाहत्यांची मने तर जिंकली, पण विश्वचषक जिंकू नाही शकलो. मी राजकोटमध्ये तेव्हाच सांगितले होते की, जून २०२४ मध्ये आम्ही मन आणि कप दोन्ही जिंकू आणि भारताचा ध्वज त्या मैदानात रोवू.”

“मी बोलल्याप्रमाणे भारताचा कर्णधार रोहित शर्माने बार्बाडोसच्या मैदानावर आपला ध्वज रोवला. या विजयात शेवटच्या पाच षटकांचे महत्त्वाचे योगदान होते. यासाठी मी सूर्यकुमार यादव, बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याचे धन्यवाद मानतो. या विजयानंतर आता भारताचे लक्ष कसोटी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही चषक जिंकू, असा मला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी व्यक्त केली.

Story img Loader