Ranji Trophy Mumbai Cricket Team Announced: मुंबई क्रिकेट संघ २३ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळणार आहे. यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने सामन्यासाठीचा संघ जाहीर केला आहे. भारतीय राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनाही संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा १० वर्षांनंतर खेळणार रणजी ट्रॉफी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झुंजत असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याची बॅट शांत होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच डावात केवळ रोहित केवळ ३१ धावा करू शकला. यानंतर रोहित शर्मा मुंबईला आल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईच्या रणज क्रिकेट संघासह सराव करताना दिसला. तेव्हापासूनच रोहित रणजी खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेरीस रोहित शर्माने रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता त्याचा आगामी मुंबई वि जम्मू काश्मीर सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा २०१३ मध्ये उत्तर प्रदेशविरूद्ध अखेरचा सामना खेळला होता.
मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक तामोरे आणि आकाश आनंद यांचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे. त्याला चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा टीम इंडियात आपली स्थान मिळवण्याचे त्याचं लक्ष्य असेल. तर रोहित शर्मा व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर यांनाही संघात संधी देण्यात आली आहे.
मुंबई वि जम्मू काश्मीर हा सामना २३ जानेवारीपासून हा सामना २३ जानेवारीपासून एमसीए-बीकेसी मैदानावर सुरू होईल. या संघात एकूण १७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्माचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड
रोहित शर्माचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड चांगला आहे. त्याने आतापर्यंत १२८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९२८७ धावा केल्या आहेत, ज्यात २९ शतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३०९ धावा आहे. त्याच्या नावावर ३३६ लिस्ट-ए सामन्यांमध्ये १३१०८ धावा आहेत.
रणजी ट्रॉफीतीस जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूूर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रायस्टन डायस, कर्ष कोठारी
© IE Online Media Services (P) Ltd