भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला हार पत्करावी लागली आहे. भारताने उभारलेल्या २६७ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावा साकारत ४ गाडी राखून विजय प्राप्त केला आहे. लियाचा तिरंगी मालिकेतील हा सलग दुसरा विजय असून, भारताची मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली आहे. सलामीवीर अॅयोन फिंचच्या ९६ धावांच्या खेळीने कांगारुनी भारतावर विजय मिळवला.
भारताने ठेवलेल्या २६८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. संघाचे अर्धशतक पूर्ण झाले त्यावेळी डेविड वॉर्नरच्या रुपाने भारताला पहिले यश मिळाले. त्यानंतर आलेल्या वॉटसन ४१ धावा करुन बाद झाला. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरला. फिंचने स्मिथच्या साथीने तिस-या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी साकारली. स्मिथला अर्धशतक पूर्ण करण्यास तीन धावा हव्य असताना अश्विनने त्याला बाद केले. त्यानंतर शतकाच्या दिशेने वाटचाल करणा-या फिंचला उमेश यादवने ९६ धावांत रोखले.
त्यापूर्वी, सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने ५० षटकात आठ गडी गमावत २६७ धावा केल्या होत्या. आर. अश्विन आणि मो. शमी नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने भारताचे सहा फलंदाज बाद केले तर ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणार्या भारतीय वंशाच्या गुरुविंदर संधूने कारकिर्दीतील पहिली विकेट मिळविली होती. भारताचा सलामीवीर शिखर धवन केवळ दोन धावा करुन बाद झाला होता. मिचेल स्टार्कनं धवनला माघारी धाडले. त्यामुळे भारताची एक बाद सहा धावा अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रहाणे १२ आणि विराट कोहली ९ धावा करून माघारी परतल्याने, भारताची अवस्था ३ बाद ५९ झाली होती. पण, रोहितने भारताचा डाव सांभाळत सुरेश रैनाच्या साथीने धावा केल्या. रोहितने १०९ चेंडूत शतक झळकावले तर दुसरीकडे रैनानेही संयमी अर्धशतक ठोकले. रोहित-रैनाने शतकी भागीदारी रचत, भारताची धावसंख्या दोनशेच्या घरात पोहोचवली. त्यानंतर एक फटका खेळण्याच्या नादात तो रैना ५१ धावांवर बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १९ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ५ बाद २३७ अशी होती. अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार भोपळा न फोडताच माघारी परतलेले.
ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४ गडी राखून विजय
सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
First published on: 18-01-2015 at 11:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharmas century in melburn one day match