Rohit Sharma’s Hair Fall: सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला मात्र, दुसऱ्या सामन्यात यजमानांकडून सहा विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. दरम्यान, कॅप्टन रोहित शर्माचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याचे केस विरळ दिसत असून काही टक्कल पडलेले आहे. छायाचित्रे पाहता, रोहित शर्माचे केस वेगाने गळत असल्याचे दिसते. यावर सोशल मीडियात मजेशीर मीम्स शेअर होत आहे.
चाहते सोशल मीडियावर रोहित शर्माच्या फोटोवर मीम्स बनवत आहेत आणि त्याला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्लाही देताना दिसत आहेत. कोणत्याही क्रिकेटपटूबरोबर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केसगळतीचा सामना करण्याची ही पहिलीच घटना नाही. असे अनेक खेळाडू होऊन गेले. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचाही समावेश आहे. महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स देखील त्याच्या कारकिर्दीत केसगळतीचा बळी ठरला होता. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील त्याच्या केस गळतीमुळे चर्चेत आला होता. त्याने आता हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.
रोहित शर्माच्या बाबतीत तसेच काहीसे घडले आहे. कर्णधारपदाच्या चिंतेमुळे रोहित शर्माचे केस उडत असल्याचेही काही लोक म्हणताना दिसत आहेत. काही यूजर म्हणतात, “वर्ल्डकप आधीच टेन्शनमुळे हिटमॅनचे केस गळायला सुरुवात झाली.” दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “हे चित्र पाहिल्यानंतर मी अक्षरशः रडत होतो. खूप थोडे केस बाकी आहेत. केस गळणे किंवा वय ही समस्या असू शकते असे मला वाटते. हे पाहून मला खूप वाईट वाटले, त्याचे केस गळायचे हे वय नाही.”
भारत- वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी
३६ वर्षीय रोहित शर्मा मागील वर्षांपासून भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारच्या संघाचा कर्णधार म्हणून काम पाहत आहे. कसोटी, वन डे आणि टी२० मध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कॅरेबियन संघाने सहा विकेट्सने जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४०.५ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ३६.४ षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावांचे लक्ष्य आरामात गाठले. तब्बल सहा वर्षांनी टीम इंडियाचा वेस्ट इंडीजमध्ये पराभव झाला आहे.