World Cup, Rohit Sharma: आयसीसी विश्वचषकादरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने भरधाव वेगात कार चालवून नियमबाह्य वर्तन केलं आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या विरोधात तीन चलन तयार झाले असून त्याचा दंड त्याला भरावा लागणार आहे. पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या कर्णधाराने कार चालवत असताना एक दोनदा नाही तर तीनवेळा कार चालवण्याची वेग मर्यादा ओलांडली. एक्स्प्रेस वे वर वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याने त्याला दंड भरावा लागणार आहे. रोहित शर्माने त्याची स्पोर्ट्स कार वेग मर्यादेपक्षा जास्त वेगाने चालवल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अहमदाबादेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबईला गेला होता. त्याने तिथे दोन दिवस आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवला. भारताच्या आगामी सामन्यासाठी उर्वरित संघ पुण्यात पोहचला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आधी मुंबईला गेला यानंतर त्याने पुण्याला जाण्यासाठी संघाच्या बस व्यतिरिक्त दुसरा मार्ग निवडला. रोहित त्याच्या स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी उरुसने पुण्यात पोहोचला.
दरम्यान, रोहितला मुंबईहून पुण्याच्या दिशेने वेगात गाडी चालवल्याबद्दल पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय कर्णधाराने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ताशी २०० किमी/प्रतितास वेगाने कार चालवली. त्यातल्या एकदा तर त्याच्या कारने ताशी २१५ किमी इतका प्रचंड वेग घेतला होता. नियम मोडून कार चालवल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंड म्हणून तीन चलन आकारले आहेत.
धोकादायक वेगात कार चालवल्याने त्याच्या नंबर प्लेटवर तीन ऑनलाइन चलन काढण्यात आल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रॅफिक विभागातील एका सूत्राने सांगितल्यानुसार “विश्वचषकाच्या मध्यावर कर्णधाराने महामार्गावर अशी गाडी चालवणे अजिबात योग्य नाही. त्यांनी फक्त संघाच्या बसमधूनच प्रवास करावा आणि त्यांच्याबरोबर एक पोलीस वाहन असावे.” हिटमॅनच्या चाहत्यांना त्याची शैली पूर्णपणे माहिती असेल. रोहित शर्माला वेग किती आवडतो हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. मात्र, विश्वचषकादरम्यान भारतीय कर्णधाराचा हा निष्काळजीपणाही चिंतेचा विषय ठरू शकतो. पंत एका धोकादायक अपघाताचा बळी ठरला होता
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही गाडी वेगात चालवायला आवडते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तो आईला भेटण्यासाठी रुरकीला जात होता. यादरम्यान त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पंतचा जीव थोडक्यात बचावला. या दुर्घटनेला जवळपास एक वर्ष होत आले आहे, पण पंतला अद्याप पुनरागमन करता आलेले नाही. आयपीएल २०२३ व्यतिरिक्त, तो कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही खेळू शकला नाही आणि त्याच्या संघाला नुकसान सहन करावे लागले. पंत २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातही खेळू शकला नाही. त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली आहे.
भारताच्या आगामी सामन्याबद्दल सांगायचे तर, संघाला विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळायचा आहे. भारताने आतापर्यंत विश्वचषकातील तिन्ही सामने शानदार जिंकले आहेत.