शुबमन गिलने बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विक्रमी २०८ धावा करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा पाचवा भारतीय ठरला, तर सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. शुबमन गिलच्या द्विशतकानंतर रोहित शर्माचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितचे हे ट्विट फक्त दोन शब्दांचे आहे पण या दोन शब्दांमध्ये त्याने सांगितले होते की शुबमन गिल हा भारतीय क्रिकेटचा आगामी स्टार असेल आणि सध्या असेच काहीसे घडताना दिसत आहे.
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलने शानदार द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. २०२३ ची सुरुवात त्याच्यासाठी खूप चांगली होती. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्धही शतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर गिलला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही देण्यात आला. पहिल्या एकदिवसीय नंतर रोहित शर्माचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने शुबमन गिलविषयी केलं होतं जुनं ट्विट
हे सर्व २०२० मध्ये शुबमन गिलच्या ट्विटपासून सुरू होते जेव्हा शुबमनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून रोहितला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ट्विट केले होते. त्यात तो लिहितो की, “रोहित शर्मा, हॅपी बर्थडे रोहित शर्मापेक्षा चांगला पुल शॉट कोणीही मारू शकत नाही.” शुबमनच्या या ट्विटला रोहित शर्मानेही उत्तर दिले पण हे उत्तर फक्त दोन शब्दात होते. रोहितने त्याच्या उत्तरात लिहिले, ‘धन्यवाद भविष्य.’ म्हणजेच यापुढील काळात भारतीय क्रिकेटचे भविष्य तूच असणार आहेस.
रोहितच्या या उत्तरावर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत आणि आगामी काळात शुबमन भारतासाठी स्टार होणार हे रोहित शर्माला आधीच कळले होते, अशी कमेंट करत आहेत. शुबमनने द्विशतक झळकावून एकदिवसीय संघात आपले स्थान पक्के केले आहे आणि आता आगामी विश्वचषकात रोहित शर्मासोबत तो सलामीला दिसणार आहे.
शुबमन गिलच्या आधी रोहित शर्मानेही सूर्यकुमार यादवबद्दल एक खास ट्विट केले होते, जे नंतर खरे ठरले. रोहितने ट्विटमध्ये लिहिले की, “बीसीसीआयसोबत चेन्नईमध्ये पुरस्काराचे काम पूर्ण झाले. काही उत्तम क्रिकेटपटू पुढे येत आहेत.. मुंबईचा सूर्यकुमार यादव.. भविष्यात त्याच्यावर लक्ष ठेवू.”