ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणे ही एक अपूर्वाईच, प्रत्येकाच्या आयुष्यातील हा स्वर्गीय सुख देणारा क्षण, ही संधी रोहित शर्माने गुरुवारी आपले अद्वितीय विश्वविक्रमी दुसरे द्विशतक झळकावत क्रिकेट जगताला दिली. तडाखेबंद, खणखणीत, बेधडक फलंदाजी करतानाही फटक्यांमध्ये असलेली सहजता, असे रोहितच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी, अद्भुत, अप्रतिम, ऐतिहासिक खेळीचे वर्णन करता येईल. गोलंदाजांना लोटांगण घालायला लावत रोहितने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चुराडा केला, तर दुसरीकडे क्रिकेट हा फक्त फलंदाजांचाच खेळ आहे, हे पुन्हा एकदा जनमानसावर बिंबवले. त्याचबरोबर तब्बल १० आठवडय़ांनंतर संघात पुनरागमन कसे करायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठही घालून दिला. रोहितच्या दुसऱ्या द्विशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४०४ अशी दमदार धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २५१ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने १५३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. द्विशतकवीर रोहितलाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिखर धवनच्या जागी सलामीला आलेल्या रोहितला चार धावांवर असतानाच पहिले जीवदान लाभले, थिसारा परेराने ‘थर्ड मॅन’ला सोडलेला झेल ही चूक श्रीलंकेला एवढी महागात पडेल, असे वाटले नव्हते; पण या जीवदानाचा पुरेपूर फायदा रोहितने उचलला. जीवदानानंतर संयत खेळ करत रोहितने अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. ७२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावल्यावर रोहितने आपल्या पोतडीतले फटके हळुवारपणे बाहेर काढले. शतकासमीप आल्यावरही त्याने फटक्यांना मुरड घातली नाही. शतक झळकावल्यावर रोहितची फलंदाजी अधिक खुलली. त्यानंतर प्रत्येक फटका श्रीलंकेच्या गोलंदाजीवर प्रहार करत असला तरी त्यामधला अलवारपणा भारतीयांना सुखावणारा होता. श्रीलंकेच्या गोलंदाजीला निष्प्रभ करत रोहितने दीड शतकाला गवसणी घातली आणि आता हा दुसरे द्विशतक झळकावणार का, या चर्चेला ऊत आला. क्रिकेटचाहत्यांना नाराज न करता ‘डीप पॉइंट’ला जेव्हा रोहितने चौकार लगावत द्विशतक झळकावले तेव्हा क्रिकेटचाहत्यांचे डोळे आनंदाने पाणावले.
दीड शतक झळकावल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंगने हा नाबाद राहिला तर २५० धावासुद्धा करेल, असे ट्विट केले आणि रोहितने तेही सत्यात उतरवले. दुसरे द्विशतक झळकावण्याचा पहिला मान रोहितने पटकावला, त्याचबरोबर वीरेंद्र सेहवागच्या २१९ धावांचा विश्वविक्रमही मोडीत काढला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितने आपली विकेट गमावली. रोहितने १७३ चेंडूंमध्ये ३३ चौकार आणि ९ षटकारांसह २६४ धावांचा एव्हरेस्ट उभारला.
कर्णधार विराट कोहलीने ६ चौकारांसह ६६ धावांची खेळी साकारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी रचली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितच्या द्विशतकाने गांगरलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. ४८ धावांमध्येच श्रीलंकेचे चार बळी बाद झाले आणि त्यांनी त्या वेळीच सामना गमावला.
अँजेलो मॅथ्यूज (७५) आणि लहिरू थिरीमाने (५९) यांनी अर्धशतके झळकावली खरी, पण विजयासाठी ती तोकडीच ठरली. भारताकडून युवा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने सर्वाधिक चार बळी मिळवले.
५० षटके खेळू शकलो याचे अतीव समाधान आहे. या गोष्टीसाठी मी कसून मेहनत घेत होतो. जास्तीतजास्त काळ खेळपट्टीवर राहण्याचा माझा प्रयत्न होता. तो सफल झाला. मॅरेथॉन खेळीमुळे दमलेलो नाही, दुखापतीमुळे माझी खुप विश्रांती झाली होती. मी आणखी ५० षटकेही खेळू शकलो असतो. विराट धावचीत झाला ही माझी चुक होती. खेळात अशा गोष्टी होत असतात, पण तो खेळाचा भाग आहे. आम्ही निर्णायक अशी भागीदारी करत होतो, आणि त्या टप्प्यावर त्याला गमावणे निराशाजनक होते. मात्र विकेट न गमावत टिकून राहण्याचे मी स्वत:लाच बजावले. या खेळीतील कुठला फटका सर्वाधिक आवडला असे सांगता येणार नाही. तीनशे करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. पण तूर्तास तरी २६४ खेळीने मी आनंदी आहे. इडन गार्डन्स या मैदानाशी माझे अनोखे नाते आहे. ही खेळी अविस्मरणीय अशी आहे.
धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे पायचीत गो. मॅथ्यूज २८, रोहित शर्मा झे. जयवर्धने गो. कुलसेकरा २६४, अंबाती रायुडू त्रि. गो इरांगा ८, विराट कोहली धावचीत ६६, सुरेश रैना झे. जयवर्धने गो. मॅथ्यूज १६, रॉबिन उथप्पा नाबाद १६, अवांतर (वाइड १०, नोबॉल १) ११, एकूण ५० षटकांत ५ बाद ४०४.
बाद क्रम : १-४०, २-५९, ३-२६१, ४-२७६, ५-४०४.
गोलंदाजी : नुवान कुलसेकरा ९-०-८९-१, अँजेलो मॅथ्यूज ८-०-४४-२, शमिंदा इरांगा १०-०-७७-१, थिसारा परेरा ५-०-४३-०, सीकुगे प्रसन्ना १०-०-७०-०, अजंथा मेंडिस ७-०-७०-०, तिलकरत्ने दिलशान १-०-११-०.
श्रीलंका : कुशल परेरा झे. कर्ण शर्मा गो. यादव ०, तिलकरत्ने दिलशान झे. रैना गो. बिन्नी ३४, दिनेश चंडिमल झे. रैना गो. बिन्नी ९, महेला जयवर्धने पायचीत गो. यादव २, अँजेलो मॅथ्यूज यष्टीचीत उथप्पा गो. पटेल ७५, लहिरू थरीमाने झे. कोहली गो. कुलकर्णी ५९, थिसारा परेरा झे. उथप्पा गो. कुलकर्णी २९, सीकुगे प्रसन्ना झे. पटेल गो. कुलकर्णी ११, नुवान कुलसेकरा झे. रायुडू गो. कुलकर्णी ०, अजंथा मेंडिस झे. कर्ण शर्मा गो. पटेल ४, शमिंडा इरांगा नाबाद १२, अवांतर (लेग बाइज ६, वाइड १०) १६, एकूण ४३.१ षटकांत सर्व बाद २५१.
बाद क्रम : १-०, २-३१, ३-४२, ४-४८, ५-१६६, ६-२१८, ७-२१९, ८-२२९, ९-२३३, १०-२५१.
गोलंदाजी : उमेश यादव ८-०-३८-२, स्टुअर्ट बिन्नी ८-०-५५-२, धवल कुलकर्णी १०-१-३४-४, कर्ण शर्मा ९-१-६४-०, अक्षर पटेल ७.१-०-५१-२. सुरेश रैना १-०-३-०.
सामनावीर : रोहित शर्मा.